पोस्ट कोविडनंतर म्युकॉरमायकोसिस ठरतोय जीवघेणा, धुळ्यात ५५ रुग्ण दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:37 AM2021-05-07T04:37:40+5:302021-05-07T04:37:40+5:30

धुळे : शहरात विविध रुग्णालयातून पोस्ट कोविड म्युकॉरमायकोसिस (कोविडनंतर आढळणारा बुरशीजन्य आजार) हा आजार असलेले रुग्ण मोठया प्रमाणात दिसून ...

55 patients admitted to Dhule after post covid | पोस्ट कोविडनंतर म्युकॉरमायकोसिस ठरतोय जीवघेणा, धुळ्यात ५५ रुग्ण दाखल

पोस्ट कोविडनंतर म्युकॉरमायकोसिस ठरतोय जीवघेणा, धुळ्यात ५५ रुग्ण दाखल

Next

धुळे : शहरात विविध रुग्णालयातून पोस्ट कोविड म्युकॉरमायकोसिस (कोविडनंतर आढळणारा बुरशीजन्य आजार) हा आजार असलेले रुग्ण मोठया प्रमाणात दिसून येत आहेत. गेल्या महिनाभरात एसीपीएम मेडिकल कॉलेजमध्ये कान, नाक, घसा विभाग तसेच दंतरोग विभागात या आजाराचे सुमारे ५५ रुग्ण दाखल झालेले आहेत. त्यातील ४९ रुग्णांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. अद्याप ६ रुग्णांवर शस्त्रक्रिया होणे बाकी आहे.

उपरोक्त आजार कोविड झाल्यानंतर बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांमध्ये आढळून येतो. हा आजार बुरशी (fungal infection) या जंतूंमुळे होतो.

या आजाराचे लवकर निदान झाले तर तो पूर्णपणे बरा होतो. अन्यथा उपरोक्त जंतूसंसर्गामुळे डोळा गमवावा लागू शकतो. कधीकधी हा आजार जीवघेणाही ठरू शकतो. त्यामुळे लक्षणांची सुरुवात झाली की, लगेचच दंतवैद्यक, तसेच नाक, कान, घसा तज्ज्ञ यांना सर्वप्रथम दाखविणे आवश्यक आहे.

या आजाराची सुरुवात नाकापासून होते. मग टाळू, डोळे तसेच मेंदूपर्यंत तो पसरतो.म्युकॉरमायकोसिस लागण संसर्गजन्य नाही म्हणजे एकापासून दुसऱ्याला, प्राण्यांपासून माणसाला त्याची लागण होत नाही.

दरम्यान, या आजारावरील उपचारासाठी जवाहर मेडिकल फाऊंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या कान, नाक, घसा विभागाचे विभागप्रुख डॉ. आर. व्ही. पाटील, डेंटल कॉलेजच्या ओरल मॅक्सिफेशियल सर्जरी विभागाचे विभाप्रमुख डॉ. बी. एम. रूडगी, प्रा. शरण बसप्पा प्रयत्न करीत आहेत.

जवाहर मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. भाईदास पाटील, उपाध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील, सहसचिव संगीता पाटील, डॉ. ममता पाटील, डिन डॉ. विजय पाटील, डेंटलचे डीन डॉ. अरूण दोडामनी यांच्या सहकार्याने म्युकॉरमायकोसिसच्या रुग्णांकरिता २० बेडचा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आलेला आहे.

या आजाराचे टप्पे

स्टेज १- नाकापर्यंत मर्यादित नाक व सायनसेस

स्टेज २ - डोळ्यापर्यंत पसरणे

स्टेज ३ - मेंदूपर्यंत पसरणे

म्युकॉरमायकोसिसचा धोका कोणाला ?

अनियंत्रित मधुमेह, अवयव प्रत्यारोपण झालेल्या, स्टेरॉईड ड्रग्ज दिलेल्या, कोविड होऊन बरे झालेल्या रुग्णांना म्हणजे एकंदरीत ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे, अशा लोकांना म्युकॉरमायकोसिसचा जास्त धोका आहे.

म्युकॉरमायकोसिसची लक्षणे कोणती?

नाकातला श्वास कोंडणे, काळ्या बुरशीचा चटटा नाक, टाळू (हार्ड पॅलेट) येथे आढळणे, दात व गाल दुखणे व सुजणे, चेहऱ्याच्या हाडांना असहय वेदना होणे, डोळा दुखणे व सुजणे तसेच दृष्टी कमजोर होणे.

म्युकॉरमायकोसिसचे निदान कसे करावे

मौखिक तपासणी, सिटीस्कॅन, नाकाची इंडेस्कॉपी व बायोप्सीच्या साह्याने आपण लवकर म्युकॉरमायकोसिसचे निदान करू शकतो. त्यामुळे वरील लक्षणे आढळल्यास आपण त्वरित दंत व मुख्य आरोग्य विशेष तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

म्युकॉरमायकोसिसवर उपचार काय?

कोविड झालेल्या रुग्णांनी सौम्य बिटाडीन नाकाचे ड्रॉप तसेच नॉर्मल सलाईन, नसल स्प्रे दिवसातून ३ वेळा नाकात टाकल्यास आपण हा बुरशीचा आजार रोखू शकतो.

तातडीने निदान करून Antifungal therapy व संसर्ग शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पोहोचला असल्यास शस्त्रक्रिया करण्याची गरज पडू शकते.

कोविड झालेल्या रुग्णांनी मौखिक तपासणी करणे आवश्यक

त्यामुळे कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांनी आणि खासकरून सोबत मधुमेह आणि इतर आजार असलेल्या रुग्णांनी एकदा मुख आरोग्य तपासणी न चुकता करून घ्यावी. कारण पुढे निस्तारण्यापेक्षा वेळेवर काळजी घेतलेली बरी. कोविड १९चे उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्सना माझी कळकळीची विनंती आहे की, सर्व बरे झालेले आणि मधुमेह असणाऱ्या रुग्णांना मुख आरोग्य तपासणी करण्याचा सल्ला द्यावा. सर्व दंत चिकित्सकांना विनंती करतो की, दातासंबंधी तक्रार घेऊन येणाऱ्या अशा रुग्णांची योग्य प्रकारे तपासणी करून त्यांना योग्य सल्ला द्यावा.

डॉ. बी. एम. रूडगी, विभागप्रमुख,

ओरल मॅक्सिलोफेशियल सर्जरी, एसीपीएम दंतवैद्यकीय महाविद्यालय

Web Title: 55 patients admitted to Dhule after post covid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.