धुळे - जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघाताच्या घटनेत महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुदेर्वी घटना घडली आहे. घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर वरखेडी रोडाच्या उड्डाणपुलावर भरधाव टँकरने महिलेला चिरडले. तर दोघे जखमी झाले. गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास अपघाताची ही घटना घडली. याप्रकरणी टँकरचालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. रेखाबाई आनंद भील (३५, वकवाड ता. शिरपूर) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या पती आनंद सुरजसिंग भील (४०) व मुलगा असे तीन जणं एमएच १५ एचई ५८१२ क्रमांकाच्या दुचाकीने वकवाडे येथे आई-वडीलांना भेटण्यासाठी जात होते. त्यादरम्यान, सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या धुळे शहरातील वरखेडी उड्डाण पुलाच्या चढवर त्यांना मागून येणाऱ्या टँकरने हुलकावणी दिली. त्यामुळे दुचाकी घसरुन आनंद भील व त्यांचा मुलगा रस्त्याच्या कडेला फेकले गेले. तर, मागे बसलेल्या रेखाबाई या टॅकरच्या मागच्या चाकात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.शिंदखेडा तालुक्यातील धावडे गाव शिवारात एमएच १२ एसयू ८८६७ क्रमांकाच्या कारने धडक दिल्याने नारायण वेडू पाटील (रा. धावडे) यांचा मृत्यू झाला. २५ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास पाटील हे शेतातून घराकडे जात होते. त्या दरम्यान त्यांना दोंडाईचाकडून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. त्यात गंभीर होऊन त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस पाटील योगेश संजय देवरे यांनी दाखल केलेल्या फियार्दीवरुन कारचालकाविरुध्द दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. हेड कॉन्स्टेबल महाजन घटनेचा तपास करीत आहेत.धुळे तालुक्यातील चौगाव शिवारात ट्रकने मागे उभ्या मजुराला चिरडल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. अमोल नामदेव सैंदाणे असे मयत झालेल्या मजुराचे नाव आहे. चौगाव शिवारातील विश्वनाथ जगन्नाथ शेंडे (रा. गाळणे) यांच्या मालकीच्या नवनाथ वजन काटा येथील मोकळ्या जागेत एमएच १८ एसी ७५५५ क्रमांकाच्या ट्रकमध्ये मका पिकांचे पोते भरण्यासाठी चालकाने ट्रक निष्काळजीपणे मागे घेताना मजूर अमोल यांच्या अंगावरुन नेला. त्यात मजूर हा जागीच ठार झाला. या तीनही घटनांची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे़
जिल्ह्यात वेगवेगळया अपघातात ३ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 22:34 IST