जन्मतःच मुक्या व बधिर असलेल्या मुलांवर काँकलियर इम्पाँल्नट शस्त्रकिया करून त्यातील दोष निवारण करता येते. यासाठी किमान आठ लाख रुपये खर्च अपेक्षित असतो. सर्वसामान्य व गोरगरिबांना हा खर्च परवडणारा नसतो. या जाणिवेने रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सीनिअर्र्सने जन्मतः मुक्या व बधिर मुलांकरिता शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात ५६ जणांची तपासणी करण्यात आली. शिबिराच्या माध्यमातून किमान २३ जणांवर शस्त्रक्रिया होणार आहे.
रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सीनिअर्स व आरसीसी अपंग राऊंड टाऊन यांच्याद्वारे रोटरी आय हॉस्पिटल येथे या शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात १२ वर्षे वयोगटातील ५६ बालकांची तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली. यातून पात्र असलेल्या २३ मूक व बधिर मुलांवर नाशिक येथील सुसज्ज व अद्ययावत रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिरातील बालकांची तपासणी, शस्त्रक्रिया, औषधोपचार मोफत आहे.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी उद्योगपती सरकारसाहेब रावल होते. प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक येथील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. शब्बीर इंदौरवाला, रोटरी सीनिअर्सचे अध्यक्ष चेतन सिसोदिया, डॉ. मुकुंद सोहनी, प्रो. चेअरमन हुसेन विरदेलवाला, आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सरकारसाहेब रावल, डॉ. शब्बीर इंदौरवाला, चेअरमन हुसेन विरदेलवाला, आदींनी मनोगत व्यक्त केले. राजेश माखिजा यांनी सूत्रसंचालन केले.
शिबिरातील बालकांची तपासणी डॉ. शब्बीर इंदौरवाला, युसूफ पंजाब, सकीना नगरवाला, राजेश अग्रवाल, आदींनी केली.
कार्यक्रम यशस्वितेसाठी रोटरी सीनिअर्सचे अध्यक्ष चेतन सिसोदिया, सचिव राजेश माखिजा, प्रो. चेअरमन हुसेन विरदेलवाला, नामदेव थोरात, डॉ. दीपक श्राॅफ, राजेश भंडारी, जवाहर केसवानी, प्रवीण महाजन, संगीता बागल, वसंत बागल, जगदीश चौधरी, सुरेश मोरे, रोटरी इनरव्हीलच्या अध्यक्षा मयूरा पारख, आदींनी प्रयत्न केले.