कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यात सुरुवातीला महाविद्यालये सुरु करण्यात आली. त्यानंतर माध्यमिक व त्यानंतर शेवटच्या टप्प्यात प्राथमिक शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. शाळा सुरु झाल्यानंतर मात्र जिल्ह्यात व राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. अनेक शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली होती. तसेच काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनाही बाधा झाल्याच्या घटना घडल्या होत्या़ तसेच कोरोनाची दुसरी लाट अतिशय तीव्र झाल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता़ शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले तसेच त्यांच्या परीक्षाही होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना थेट पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ मात्र विद्यार्थ्यांच्या प्रगती पुस्तकावर वर्गोन्नत असा उल्लेख येणार का याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे़ विद्यार्थ्यांना वर्गोन्नती द्यावी असे पत्रात म्हटले आहे मात्र तसा उल्लेख प्रगती पुस्तकावर करण्याबाबतच्या सूचना प्राप्त झाल्या नसल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली़ दरम्यान, वर्षभरापासून शाळा बंद असल्याने घरी राहून विद्यार्थीही कंटाळले आहेत़ घरकामात तसेच शेतीच्या कामात विद्यार्थी मदत करत आहेत़ कोरोनाचा संसर्ग लवकर संपून शाळा सुरू होण्याची अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे़
प्रगती पुस्तकच बदलणार
-कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शाळा बंद होत्या तसेच यंदा परीक्षाच झाल्या नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांना थेट पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे़ विद्यार्थ्यांना वर्गोन्नत करावे अशा आशयाचे पत्र शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे़ दरवर्षी प्रगती पुस्तकावर येणारी श्रेणी यावेळी येणार नाही त्यामुळे प्रगती पुस्तकच बदलणार आहे़ प्रगती पुस्तकावर वर्गोन्नत उल्लेख करण्याबाबत सूचना नसल्याची माहिती मिळाली़
मुले घरात कंटाळली-
शाळा बंद असल्याने नुकसान होत आहे़ पण काेरोना वाढल्याने शाळा बंद झाल्या आहेत़ त्यामुळे सध्या घरीच अभ्यास करतो़ कोरोना संपून शाळा लवकर सुरू झाल्या पाहिजेत.
- पूजा कोळी, वाडी
इयत्ता चौथी
यंदा परीक्षा झाल्या नाहीत पण पुढील वर्गात प्रवेश मिळणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले आहे़ काेरोना संपून शाळा लवकर सुरू व्हायला पाहिजे.
-
वर्षभरापासून शाळा बंद असल्याने घरी राहून कंटाळा आला आहे़ ऑनलाईन अभ्यासासोबतच घरी व शेतात मदत करत आहे.
- आरुषी धनगर, वाडी
इयत्ता तिसरी
शिक्षण अधिकारी :
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नत करावे याबाबत शासनाने सूचना केल्या आहेत़ मात्र प्रगती पुस्तकावर वर्गोन्नत असा उल्लेख करण्याबाबत कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत़ त्याबाबतच्या सूचना मिळाल्यानंतर शिक्षकांना मार्गदर्शन केले जाईल़
मनिष पवार, शिक्षण अधिकारी