भूषण चिंचोरे
धुळे - येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल १२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतरही त्यांना त्रास होत असल्याने त्यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली. सक्रिय रुग्णांची संख्या ११ पर्यंत खाली आली आहे. मात्र कोरोनामुक्त झाल्यानंतरही काही रुग्ण अजूनही रुग्णालयातच आहेत. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात केवळ एक कोरोनाबाधित रुग्ण दाखल आहे. मात्र कोरोनातून बरे झाल्यानंतरही उपचारांची गरज पडत असलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. सध्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या १२ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला आहे. मात्र काही रुग्णांना श्वास घेण्याचा व काहींना न्यूमोनिया असल्याने त्यांची रुग्णालयातून सुट्टी झालेली नाही. तसेच सरीचे रुग्णही दाखल आहेत. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड विभागाचा ताण कमी झाला होता. मात्र काही रुग्णांना कोरोनामुक्त झाल्यानंतरही त्रास होत असल्याने चिंता वाढली आहे. दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर तर ३ रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत असल्याची माहिती मिळाली.
कोरोनातून बरा, पण श्वसनाचा त्रास
- कोरोनातून बरे झाल्यानंतरही काही रुग्णांना त्रास होत असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
- कोरोनामुक्त झालेले पण रुग्णालयात दाखल असलेल्या काही रुग्णांना श्वसनाचा त्रास होत असल्याची माहिती मिळाली.
- काही रुग्णांना न्यूमोनिया असल्याने ते रुग्णालयात दाखल आहेत.
बरे झाल्यानंतरही घ्या काळजी
- कोरोनावर मात केल्यानंतरही तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे.
- कोरोनामुक्त झाल्यानंतर वेळोवेळी आपल्या फॅमिली डॉक्टरकडून तपासणी करून घ्यावी.
- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्त पातळ करण्याची गोळी घ्यावी. तसेच मधुमेह असलेल्यांनी औषधे नियमित घ्यावी. हलका व्यायाम करावा.
पोस्ट कोविडचा सर्वाधिक धोका जेष्ठांना
कोरोनामुक्त झाल्यानंतरही काही रुग्णांना त्रास होत असतो. पोस्ट कोविडचा सर्वाधिक धोका जेष्ठ नागरिकांना असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनावर मात केल्यानंतरही त्रास झालेल्या रुग्णांमध्ये जेष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. मधुमेह व हृदयरोगाच्या रुग्णांनी औषधे नियमित घ्यावी.
प्रतिक्रिया -
कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. घराबाहेर पडत असाल, गर्दीच्या ठिकाणी जात असाल तर मास्कचा वापर कटाक्षाने केला पाहिजे. कोरोना प्रतिबंधक लस घेतली असेल तर काही जण मास्क वापरत नाहीत. मात्र असे करणे चुकीचे आहे. लस घेतली असेल किंवा अँटीबॉडी निर्माण झाल्या असतील तरीही मास्क वापरलाच पाहिजे अन्यथा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
- डॉ. निर्मलकुमार रवंदळे, औषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख हिरे महाविद्यालय
आजचा कोविड पॉझिटिव्हिटी रेट - ०. टक्के
एकूण रुग्ण - ४५७७९
कोरोनामुक्त - ४५१००
सध्या उपचार - ११
मृत्यू - ६६८