तुळजापूर तालुक्यातील येडोळा गावाला जोडणाऱ्या नळदुर्ग-अक्कलकोट रोड ते येडोळा रस्त्यावरील बोरी नदीवरील पूल गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहून गेला आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने सदर पूल बांधण्यासाठी निधी मंजूर केला. मात्र, ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे पुलाचे काम अद्याप हाती घेण्यात आले नाही. परिणामी मागच्या तीन दिवसांपासून येडोळा गावचा संपर्क तुटल्याने ग्रामस्थांना दैनंदिन व्यवहाराठीची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
मागच्या वर्षी परतीच्या मान्सूनची अतिवृष्टी झाल्याने परिसर जलमय होऊन नदीपात्रावरील केटी बंधारे, सीडी वर्क रस्ते, पूल वाहून गेले होते. त्याकडे जिल्हा प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ येडाळा गावाला जोडणारा बोरी नदीवरील पूल बांधावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.