(फोटो : देवीसिंग राजपूत १७)
येणेगूर : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील पुलाचे बांधकाम मागील चार वर्षांपासून रखडले असून, या बांधकामासाठी आणलेले सिमेंटचे पाईप येणेगूर-दावलमलीकवाडी रस्त्यावर धूळखात पडले आहेत. त्यामुळे हे काम त्वरित मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे.
साडेचार कोटीच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून येणेगूर-दावलमलीकवाडी-सुपतगाव-कोराळ ते शास्त्रीनगर तांडा या गावांना जोडण्यासाठी जिल्हा विशेष कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून डांबरीकरण करण्यात आले होते. याला चार वर्षे लोटली. यानंतर येणेगूर पासून अर्ध्या किमी अंतरावरील कोराळ विहिरी नजीक असलेल्या पुलासाठी हे तीन सिमेंट नळकांडे आणण्यात आले. संबंधित शेतकऱ्यांच्या अडवणुकीमुळे या फरशी पुलाचे बांधकाम राहून गेले. संबंधित खात्याच्या कनिष्ठ अभियंत्याने शर्थीचे प्रयत्न करून त्या अडवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, शेतकऱ्यांनी आपला हट्ट न सोडल्याने हे काम आजवर मार्गी लागू शकले नाही. त्यामुळे हे तीनही नळकांडे तब्बल चार वर्षांपासून धूळखात पडले आहेत. संबंधित विभागाने या पुलाचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे.