विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनात बारावीचे वर्ष फार महत्वाचे असते. परंतु कोरोनाच्या साथीमुळे यावर्षीच्या बारावीच्या परीक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बारावीनंतर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ज्या संधी आहेत त्यासाठी त्यांच्या स्वतंत्र प्रवेश परीक्षा होत असतात. त्यामुळे बारावीचे गुण देखील महत्वाचे मानले जात असतात. त्यामुळे या परीक्षा होणे महत्वाच्या आहेत. सध्या परीक्षेबाबत शासन विचारात आहे तर विद्यार्थी पालक परीक्षा होतेय की नाही या संभ्रमात आहेत. वर्षभरातील दोन महिन्याच्या जवळपास महाविद्यालय सुरु राहिले. त्यानंतर शैक्षणिक संस्थानी ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करुन घेण्यावर भर दिला. विद्यार्थ्यांनीही ऑनलाईन पद्धतीने अभ्यास केलेला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची लिहिण्याची गतीही मंदावली आहे. त्यामुळे ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन परीक्षा घ्याव्यात अशी मागणी विद्यार्थी पालकांतून होत आहे. तर काही शिक्षणतज्ज्ञ व विद्यार्थ्यांचे म्हणणे परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घ्याव्यात असे आहे.
वर्षभरात केवळ एक ते दीड महिना कॉलेज सुरु राहिले. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीनेच अभ्यासक्रम घेण्यात आला आहे. घरी राहूनच अभ्यास केला आहे. सरकारने परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात.
पूजा क्षीरसागर, विद्यार्थीनी
कोरोनाच्या संसर्गामुळे मी बारावीचा अभ्यास ऑनलाईन पद्धतीनेच केला आहे. अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. मात्र, जेवढा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. त्याअनुषंगाने बहुपर्यायी पद्धतीने ऑनलाईन परीक्षा घेण्यात यावी.
सालार कोतवाल, विद्यार्थी
कोरोनाच्या संसर्गामुळे चार महिने महाविद्यालयात दररोज चार तास अध्ययन झाले. ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. परीक्षेच तयारी झाली असून हॉलतिकीटही मिळाले आहे. तेव्हा शासनाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करुन कोरोना नियमांचे पालन करुन परीक्षा घेतल्या पाहिजेत. अन्यथा कोरोना बॅच म्हणून आयुष्यभर ओळखले जाईल.
वैष्णवी फुटगे,
प्रतिक्रिया....
नोव्हेंबर २०२० मध्ये एका वर्गात २५ विद्यार्थी बसवून पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. फिजिकल डिस्टन्स ठेवून तसेच मास्क सॅनिटायझरचा वापर करुन परीक्षा घेता येऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने परीक्षा होणे गरजेच्या आहेत. लेखी परीक्षा नाही झाल्या तरी पर्यायी व्यवस्था म्हणून बहुपर्यायी पद्धतीने ऑनलाईन परीक्षा घेणे उपयुक्त ठरु शकते.
प्रशांत पाटील, प्राचार्य, छत्रपती शिवाजी हायस्कूल, उस्मानाबाद
बारावीच्या परीक्षाविना वार्षिक निकाल तयार करणे महाविद्यालयास अडचणीचे ठरू शकते. यामध्ये गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो. यासाठी वर्षभर कुठलेही नियोजन नव्हते. कोरोनाच्या साथीमुळे वर्षाप्रमाणे परीक्षा घेणे कठीण असले तरी वेगळी पद्धत अवलंबून परीक्षा घेतल्या गेल्या पाहिजेत. आता फार काळ विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवता येणार नाही. याची सर्वांनी दखल घेतली पाहिजे.
प्राचार्य डॉ घनश्याम जाधव,श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय
इयत्ता बारावी नंतर कोणत्याही अभ्यासक्रमास प्रवेश घेताना प्रवेश पूर्व परिक्षा असते. त्यामुळे इयत्ता बारावीची ऑफलाइन परीक्षा रद्द करावी. थोड्या दिवसात पावसाळा येईल, ग्रामीण भागांमध्ये आठ आठ दिवस वीज नसते, इंटरनेट, मोबाईल चार्जिंग व अँड्रॉइड मोबाईलची उपलब्धता असे अनेक प्रश्न असल्यामुळे ऑनलाईन परीक्षा घेणे सुद्धा अवघड आहे. विद्यार्थ्याची वार्षिक कामगिरी पाहून अंतर्गत मूल्यांकन करून इयत्ता बारावीचा लवकर निकाल जाहीर करणे उचित राहील. कारण पुढील प्रवेशासाठी प्रवेश पूर्व पात्रता परीक्षेची मुलांना तयारी करता येईल.'
- प्राचार्य डॉ. दिलीप गरुड ,आदर्श महाविद्यालय उमरगा.