जुगारअड्ड्यांवर पोलिसांचे छापे
उस्मानाबाद : पोलीस प्रशासनाने ४ जानेवारी रोजी वेगवेगळ्या ठिकाणी जुगारअड्ड्यांवर छापे टाकले. वाशी पोलीस ठाण्याच्या पथकाने पारगाव येथे ‘राज पान सेंटर’च्या पाठीमागे कल्याण मटका जुगाराचे साहित्य व रोख रकमेसह संभाजी गिराम याच्यावर कारवाई केली. तसेच परंडा पोलिसांनी सादीक मुजावर याच्यावर कारवाई केली. मुजावर हा राहत्या गल्लीत जुगाराचे साहित्य व रोख रकमेसह पथकास आढळून आला. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अवैध दारूविक्री ; ठिकठिकाणी छापे
उस्मानाबाद : परंडा पोलीस ठाण्याच्या पथकाने ४ जानेवारी रोजी दोन ठिकाणी छापे टाकून अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. पहिल्या घटनेत माणकेश्वर येथील सुधाकर घोडके हा देशी दारूच्या १३ बाटल्यांसह पथकास आढळून आला. दुसरा छापा दहिटणा येथे टाकण्यात आला. येथे पुरुषोत्तम जगताप याच्याकडे देशी दारूच्या पंधरा बाटल्या पोलिसांना मिळाल्या. हा मुद्देमाल जप्त करून वरील दोघांविरूद्ध परंडा पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, भूम पोलिसांनीही वरूड येथे छापा टाकून अशोक माने याच्यावर कारवाई केली.
पानबुडी विद्युत पंप अज्ञाताने पळविला
उमरगा : बांधकामाच्या ठिकाणी खोदलेल्या खड्ड्यातील पानबुडी विद्युत पंप अज्ञाताने चोरून नेल्याची घटना आलूट परिसरात घडली. आलूर येथील रत्नाकर शंकरराव माने यांच्या पेट्रोलियम किरकोळ विक्री केंद्राचे बांधकाम आलूर येथील गट क्र. १२३४ मध्ये सुरू आहे. माने यांनी या ठिकाणी खड्डा घेऊन त्यात पानबुडी विद्युत पंप बसविला होता. २६ व २७ डिसेंबरच्या रात्री तो चोरीस गेला. गावातीलच एखाद्या व्यक्तीने हा पंप चोरल्याचा संशय माने यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे. याप्रकरणी ५ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
शेतातील दगड नेल्याच्या कारणावरून मारहाण
कळंब : शेतातील दगड नेल्याच्या कारणावरून महिलेसह त्यांच्या सासऱ्यास मारहाण झाल्याची घटना तालुक्यातील डिकसळ शिवारात ४ जानेवारी रोजी घडली. डिकसळ येथील सुनिता कापरे या ४ जानेवारी रोजी डिकसळ येथील स्वत:च्या शेतात होत्या. यावेळी शेतातील दगड नेल्याच्या कारणावरून शेताशेजारी श्रीरंग अंबीरकर यांनी सुनिता कापरे व त्यांचे सासरे रावसाहेब यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सुनिता कापरे यांच्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
मारहाणीत चाकूने वार; एकजण गंभीर जखमी
उस्मानाबाद : मारहाणीत छातीवर व पोटावर चाकूने वार केल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील खेड येथे ४ जानेवारी रोजी घडली. खेड येथील रिजवाना शेख व हसिना शेख यांच्यात वाद सुरू असताना रिजवाना यांचे पती समीर शेख यांनी यात हस्तक्षेप केला. यावेळी हसिना यांचे पती मुस्तफा शेख यांच्यासह हुसेन शेख, अक्षय पवार व अन्य एका व्यक्तीने समीर शेख यांना शिवीगाळ व मारहाण केली. हुसेन शेख यांनी समीर यांच्या छाती व पोटावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी समीर शेख यांच्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नागरिकांची गैरसोय
उस्मानाबाद : शहरातील समर्थनगर भागातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. बहुतांश ठिकाणचे डांबरीकरण निघून गेले असून, त्या ठिकाणी दगड उघडे पडले आहेत. यामुळे दुरुस्तीची मागणी होत आहे.
अंधाराचे साम्राज्य
उस्मानाबाद : शहरातील समतानगर, रामनगर, आनंदनगर या भागातील काही ठिकाणचे अंतर्गत पथदिवे सातत्याने बंद राहत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी या भागातील रहिवाशांची मोठी गैरसोय होत असून, पालिका प्रशासानाने हे दिवे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.
गावठी दारू जप्त
वाशी : येथील पोलीस ठाण्याच्या पथकाने पिंपळगाव (लिंगी) येथे छापा टाकला असता रामदास लोकरे हे एका कॅनमध्ये अवैध गावठी दारूसह मिळून आले. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला.
शेतकरी त्रस्त
अणदूर : यंदा मुबलक पावसामुळे रबी हंगामातील पिकांची वाढ चांगली झाली असून पिकांना पाणी देण्याचा कालावधी आहे. परंतु, यातच ग्रामीण भागात शेतीच्या वीजपुरवठ्यात अनेकदा व्यत्यय येत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
अवैध धंदे वाढले
येरमाळा : कळंब तालुक्यातील येरमाळा व परिसरात सध्या अवैध दारूविक्री, मटका, जुगार यासारखे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यासोबतच महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याचीदेखील खुलेआम विक्री होत आहे. त्यामुळे यावर कारवाईची मागणी केली जात आहे.