उस्मानाबाद : बोलीभाषेतून समाजाचे प्रश्न समाजापर्यंत मांडण्याचे अनमोल असे कार्य लोककलावंत अनेक पिढ्यांपासून करीत आले आहे. कलावंताप्रती उत्तरदायित्व म्हणून सरकार अशा कलावंतांना मदतीचा हात देते. त्यासाठी राष्ट्रीयस्तर, राज्यस्तर आणि स्थानिक स्तर असे वर्ग पाडण्यात आले आहेत. कलावंतांच्या कलेचा सन्मान म्हणून त्यांना मानधनही दिले जाते. हे मानधन तोकडे आहे, तर सर्वच क्षेत्रातील कलावंतांना मोलाचा आधार आहे. कोरोनामुळे दीड वर्षापासून बंदी असल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट आहे.
मदत हातात किती उरणार
कोरोनाने लोककलावंतांचे कार्यक्रम थांबले आहेत. यातून कलावंत अडचणीत आले आहेत.
पूर्वी ‘क’ वर्गातील लोककलावंतांना एक हजार ५०० रुपयांचे मानधन मिळत होते. आता दोन हजार २५० रुपये मानधन मिळत आहे.
ही मदत काही मोजक्याच लोकांच्या हाती पडते. शेकडो कलावंत आजही वंचित आहेत.
राज्य सरकारची मदत कधी मिळणार
५० वर्ष पूर्ण करणाऱ्या कलावंतांना मानधन म्हणून २२५० रुपये जाहीर झाले.
ज्यावेळी ग्रॅड उपलब्ध होईल त्यावेळेस ही मदत लोककलावंतांच्या खात्यात वळती होते.
अनेकवेळा ही मदत कलावंतांना वेळेवर मिळत नाही. ती केवळ नावालाच असल्याचे बोलले जाते.
कोरोना संकटात कलावंतांना उपासमारीची पाळी आल्याने संकटात असलेल्या कलावंतांना राज्य शासनाने पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली असली तरी ही मदत तोकडी आहे. उलट जनजागृतीचे कामे करावी लागत आहेत.
महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीनिमित्त गायन व देवीचे गाणे म्हणून उपजीविका भागवत होतो. कोरोनामुळे दीड वर्षापासून काम नाही. दीड वर्षात शासकीय योजनेच्या जनजागृतीचे पाच कार्यक्रम मिळाले आहेत. आता बांधकामवर मजूर म्हणून काम करीत आहे.
सिद्धार्थ सावंत, कलावंत
गायनपार्टीच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविला जात होता. मात्र, कोरोनामुळे कार्यक्रमांवर निर्बंध आले. त्यामुळे आता पालिकेच्या घंटागाडीवर कचरा गोळा करण्यासाठी जावे लागत आहे.
दत्ता गायकवाड, कलावंत
मानधनासाठी पात्र ठरविताना सरकारने लागू केलेले नियम अडचणीचे ठरत आहेत. सध्याची स्थिती लक्षात घेता यामध्ये बदल केले पाहिजेत. कोरोनापासून आम्ही कसे जगत आहोत याचा विचार केला पाहिजे.
राम लोहार, कलावंत