(सिंगल फोटो : बालाजी बिराजदार १३)
लोहारा : तालुक्यातील भातागळी गावात चैत्र शुध्द प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण गावातर्फे एकच गुढी म्हणजे महादेवाची काठी महादेव मंदिरात उभारण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. शंभू महादेवाची अर्धांगिनी असलेल्या पार्वतीचा अवतार समजून या काठीची प्रतीकात्मक प्रतिष्ठापना करण्यात येते. परंतु, मागील वर्षापासून कोरोनामुळे या परंपरेला खंड पडला असून, मागील वर्षी व यंदाही मंदिरात केवळ छोटी गुढी उभारण्यात आली आहे.
तेरणा नदीच्या काठावर वसलेले लोहारा तालुक्यातील भातागळी हे गाव. येथे दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी गावात कोणाच्याच घरासमोर गुढी उभारण्याची परंपरा नाही. शंभो महादेवाची काठी हीच गावची एकमेव गुढी उभारली जाते. ही काठी सायंकाळी सहाच्या सुमारास उभारण्यात येते. गुढीपाडव्यानंतर तिसऱ्या दिवशी शेकडो भक्तमंडळी ही शंभो महादेवाची काठी घेऊन पायी शिखर शिंगणापूरला जातात. साधारण भातागळी ते शिखर शिंगणापूर हे अंतर २५० किमीचे आहे. दररोज ४० किमीचा पायी प्रवास करत भक्त हे अंतर सहा दिवसात पूर्ण करतात. ही काठी भातागळी, लोहारा, उस्मनाबाद, सोलापूर, पुणे, सातारा जिल्ह्यातून शिंगणापुरात पोहोचते. तेथे या काठीला विशेष मान आहे. गुढीपाडव्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेला ही काठी परत गावात येते. या दिवशी काठीच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव व परिसरातील भक्त मोठ्या संख्येने हजेरी लावतात. यात महिला भक्तांची संख्या लक्षणीय असते. या दिवसापासून गावात मोठी यात्रा भरते. ही यात्रा तीन दिवस असते. या यात्रेसाठी गावातून नोकरी, व्यवसायासाठी बाहेरगावी गेलेले नागरिकही आवर्जून हजेरी लावतात.
दरम्यान, गेल्या वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही यात्रा व इतर सर्व धार्मिक कार्य रद्द करण्यात आले. त्यामुळे गेल्या वर्षी गावची गुढी उभारली गेली नाही. यावर्षीही तीच परिस्थिती कायम असून, प्रतीकात्मक छोटी गुढी उभारण्यात आली आहे. त्यात शासनाच्या आदेशानुसार मंदिर बंद केले असल्याने प्रत्येक जण घरातच पूजाअर्चा करीत आहेत.