अणदूर : अद्याप रस्त्याचे काम पूर्ण झालेले नसतानाही तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी येथील महामार्गावर मात्र टोल वसुली सुरु करण्यात आली आहे. याबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
टोल वसुलीविरोधात अणदूर येथे हुतात्मा स्मारक सभागृहामध्ये सोमवारी बैठक घेण्यात आली. यानंतर निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना टोलविरोधी कृती समितीने निवेदनही दिले. फुलवाडी नाक्यापासून उमरग्यापर्यंत रस्त्याचे व उड्डाणपुलाचे काम अजूनही रखडले आहे. असे असताना टोल वसुली नियमित केली जात आहे. फुलवाडी येथून दोन-तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील वाहनचालकांकडूनही टोल वसुली सुरूच आहे. अणदूर येथे मोठी बाजारपेठ, बँका, शाळा, महाविद्यालय, दवाखाने असल्याने येथील जनतेला दिवसातून अनेकवेळा या रस्त्यावरून ये-जा करावी लागते. त्यामुळे टोलनाक्याच्या या वसुलीमुळे व्यापारी, शेतकरी, नागरिकांची मोठी कोंडी होत आहे. फुलवाडी, धनगरवाडी, अणदूर येथील ग्रामपंचायतींनी वाहनाला टोल घेऊ नये, असा ठराव मंजूर करून संबंधित टोल नाका अधिकाऱ्यांना दिला. मात्र, त्याला त्यांनी केराची टोपली दाखवली असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे यासंदर्भात पंधरा दिवसात योग्य ती कार्यवाही न झाल्यास लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचे टोलविरोधी कृती समितीने म्हटले आहे. या निवेदनावर रामचंद्र आलुरे, पवन घुगरे, ॲड. दीपक आलुरे, डॉ. जितेंद्र कानडे, बाळकृष्ण घोडके, सिद्राम शेटे, दयानंद मुडके, मलंग शेख, धनराज मुळे, किशोर पुजारी, साहेबराव घुगे, प्रशांत कुलकर्णी, मधुकर बंदपट्टे, नागनाथ मुडके, अनिल मुळे, सिकंदर अंगुले, सचिन ढेपे, विक्रांत दुधाळकर, संजीव गाढवे यांच्या सह्या आहेत.
आमच्या धनगरवाडी गावापासून टोल नाका हा एक किलोमीटर अंतरावर आहे. आम्हाला अणदूरला नेहमी वैयक्तिक कामानिमित्त जावे लागते. त्यामुळे जाताना आणि येतानाही आमच्याकडून टोल वसूल केला जातो, आम्हाला याचा त्रास होत आहे.
- बिरु दुधभाते, माजी सरपंच, धनगरवाडी
अणदूर ते फुलवाडी हे चार किलोमीटर अंतर असून, अणदूरहून शेकडो गाड्या सोलापूरला ये-जा करत असतात. नियमानुसार दहा किलोमीटर अंतरावरील वाहनांना टोलमधून सूट देणे गरजेचे आहे. परंतु, टोलनाका अधिकाऱ्यांकडून ही सूट दिली जात नाही. पुढील १५ दिवसात याबद्दल योग्य कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय टोलविरोधी कृती समितीने घेतला आहे.
- डाॅ. जितेंद्र कानडे, सदस्य, टोलविरोधी कृती समिती