कळंब : तक्रारी अर्जाची दखल न घेणाऱ्या पाेलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी कळंब तालुक्यातील डिकसळ येथील एका कुटुंबाने शनिवारी पाेलीस मुख्यालयासमाेर उपाेषण सुरू केले आहे.
वारंवार तक्रारी अर्ज करूनही पोलीस यंत्रणा दखल तर घेतच नाही, परंतु आपल्यालाच पोलिसांकडून समजपत्र दिले जात आहे. आपल्या तक्रारीची दखल घेऊन संबंधितावर गुन्हा नोंद करावा व कार्यवाहीस टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, या मागणीसाठी कळंब तालुक्यातील डिकसळ येथील शेतकरी सचिन वाघमारे हे उस्मानाबाद पोलीस मुख्यालयासमोर कुटुंबासह उपोषणास बसले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने २००५-०६ मध्ये डिकसळ येथील शेतकरी सचिन वाघमारे यांच्या शेतातून रस्त्याचे काम मंजूर केले हाेते. या कामास वाघमारे यांनी हरकत घेतली. ‘‘माझ्या मालकीच्या शेतातून रस्त्याचे काम केले जाऊ नये’’, असे बांधकाम विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांना सांगितले हाेते, असे असतानाही त्यांनी हे काम रेटून नेले. ही बाब वाघमारे यांनी शासनाच्या विविध विभागासह पाेलीस यंत्रणेच्याही निदर्शनास आणून दिली हाेती. तसा तक्रारी अर्जही दाखल केला हाेता. परंतु, त्यांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नाही. उलट वाघमारे यांनाच समजपत्र पाठविण्यात आले. वारंवार अर्ज, विनंती करूनही संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याची भूमिका पाेलीस अधिकाऱ्यांनी घेतली, असा आराेप करीत वाघमारे यांनी सहकुटुंब पाेलीस अधीक्षक कार्यालयासमाेर उपाेषण सुरू केले आहे. तक्रारी अर्जाची दखल न घेतलेल्या पाेलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
140821\img-20210814-wa0089.jpg
तक्रारीची दखल न घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कार्यवाहीसाठी कळंब तालुक्यातील डिकसळ येथील सटवा वाघमारे हे कुटुंबासह उस्मानाबाद येथे उपोषणास बसले आहेत.