घरकुलाच्या कामासाठी दोघा अभियंत्यांची झाली नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:32 AM2021-04-10T04:32:17+5:302021-04-10T04:32:17+5:30

कळंब : घरकुल योजनेलाच ‘घरघर’ लागल्याची स्थिती निर्माण झालेल्या तालुक्यातील लाभार्थ्यांची होणारी फरफट ‘लोकमत’ने ‘व्यथा घरकुलाच्या’ या वृत्तमालिकेतून प्रकर्षांने ...

Two engineers were appointed for the housework | घरकुलाच्या कामासाठी दोघा अभियंत्यांची झाली नियुक्ती

घरकुलाच्या कामासाठी दोघा अभियंत्यांची झाली नियुक्ती

googlenewsNext

कळंब : घरकुल योजनेलाच ‘घरघर’ लागल्याची स्थिती निर्माण झालेल्या तालुक्यातील लाभार्थ्यांची होणारी फरफट ‘लोकमत’ने ‘व्यथा घरकुलाच्या’ या वृत्तमालिकेतून प्रकर्षांने मांडली होती. याची दखल घेत पंचायत समिती स्तरावर तातडीने दोन अभियंत्याच्या खांद्यावर घरकुलाचा ‘अतिरिक्त’ भार देण्यात आला आहे. यामुळे पुढील काळात तरी गरिबांच्या घरांच्या संचिका धावतील, अशी अपेक्षा केली जात आहे.

कळंब पंचायत समितीच्या घरकुल विभागाच्या माध्यमातून रमाई, प्रधानमंत्री, शबरी, पारधी असा समाजातील विविध घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येतात. यासाठी मंजुरी ते अनुदान अदा करणे ही कामे पंचायत समिती पार पाडतात; परंतु कळंब पं. स. मध्ये सध्या या विभागात अपुरे मनुष्यबळ असून, ४ ऐवजी एकच बाह्य अभियंता, एकच लिपिक व एकच डाटा एन्ट्री ऑपरेटर कार्यरत आहेत. असे असताना त्यांच्यावर चालू आर्थिक वर्षातील केवळ रमाई आवास योजनेच्या दोन हजारावर घरकुलाचा भार आहे.

याशिवाय मंजूर घरकुलाचे वर्क कोड जनरेट न होणे, रोजगार सेवकांनी मस्टर न काढणे, पहिले व दुसरे हप्ते प्रलंबित असणे आदी कारणांमुळे राहतं कच्च-पक्क घर पाडून ‘घरकुल’ बांधकाम हाती घेतलेल्या गोरगरीब लाभार्थ्यांची मोठी फटफजिती सुरू झाली होती.

यानंतर मागच्या दोन दिवसात ‘लोकमत’च्या वृत्त मालिकेची दखल घेत गटविकास अधिकारी एन. पी. राजगुरू यांनी घरकुल हा विषय आपल्या अजेंड्यावर घेतला आहे. यातून अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करणे, संबंधिताना सूचना देत कामकाजाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे.

चौकट...

एक बाह्य अभियंता झाले कार्यमुक्त

सी. जी. पारडे यांच्याकडे ईटकूर, येरमाळा तर एन. बी. मंडगे यांच्याकडे नायगाव, शिराढोण जि. प. गटातील घरकुल बांधकाम, त्यांची मस्टर काढणे व मोजमाप नोंदवण्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय बाह्य अभियंता एस. ए. टेकाळे यांना कार्यमुक्त करण्यात आले असून, दुसरे बाह्य अभियंता ए. ए. टेकाळे यांच्याकडील जि. प. गट बदलून डीकसळ, मंगरूळ, खामसवाडी व मोहा या गटाची जबाबदारी दिली आहे.

रोजगार सेवकांना स्पष्ट ताकीद

मस्टर काढण्यास विलंब लागत असल्याने दुसरे हप्ते प्रलंबित राहत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने मांडले होते. याची दखल घेत गट विकास अधिकारी एन. पी. राजगुरू यांनी सहायक गट विकास अधिकारी प्रमोद कुसन्नेनीवार, कार्यक्रम अधिकारी लक्ष्मण उळगे यांच्यासमवेत तालुक्यातील रोजगार सेवकांची बैठक घेतली. यात घरकुल लाभार्थ्यांचे तत्काळ मस्टर काढण्याच्या सूचना दिल्या. अडचणी जाणून घेतल्या. यावेळी पालक तांत्रिक अधिकारी चारूदत्त सरवदे, सचिन आडसूळ उपस्थित होते.

काहींचे हप्ते सुटले, अनेकांचे वर्क कोड आले

तालुक्यातील रमाई आवास योजनेंतर्गतच्या १ हजार ३८९ घरकुलांपैकी अनेकांचे पहिले, दुसरे हप्ते प्रलंबित होते. शेकडो लाभार्थ्यांच्या कामाचे वर्क कोड जनरेट झाले नव्हते. याविषयी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर यासंबंधीच्या कार्यवाहीनेदेखील गती घेतली आहे. सहाशेवरील वर्क कोडचा आकडा साडेनऊशे झाला आहे. काहींचे दुसरे हप्तेही मार्गी लागले आहेत.

प्रतिक्रीया

घरकुलांची संख्या मोठी असताना मनुष्यबळ अपुरे आहे. काही तांत्रिक अडचणीही होत्या. सध्या दोन अभियंत्याना अतिरिक्त पदभार दिला आहे. रोजगार सेवकांची बैठक घेतली आहे. घरकुल योजनेसंदर्भात रोजगार सेवक, ग्रामसेवक, कार्यालयीन कर्मचारी यांना गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मी दररोज आढावा घेत आहे.

एन.पी.राजगुरू गट विकास अधिकारी

घरकुल योजनांचे लाभार्थी सध्या अनेक अडचणींना तोंड देत आहेत. ‘लोकमत’ने याला वाचा फोडली आहे. गरिबांच्या या प्रश्नावर सडेतोड भूमिका मांडत प्रशासनाला हलवले आहे. आगामी काळात विशेष कॅम्प घेत समस्यांचा निपटारा घ्यावा व गती द्यावी.

- अनिल हजारे, जिल्हाध्यक्ष. रिपब्लिकन सेना

Web Title: Two engineers were appointed for the housework

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.