उस्मानाबाद -नगर पालिका निवडणुकीमध्ये ‘एक वाॅर्ड, एक नगरसेवक’ अशी घाेषणा सुरूवातीला करण्यात आली हाेती. त्यामुळे ‘स:बळा’वर विश्वास असलेल्या अनेकांनी गढघ्याला बाशिंग बांधून वाॅर्डामध्ये लहान-माेठे उपक्रम तसेच गाटीभेटी सुरू केल्या हाेत्या. मात्र, सरकारने हा निर्णय बदलून ‘एक प्रभाग, दाेन नगरसेवक’ असे सूत्र जाहीर केले. त्यामुळे ‘काेणत्याही पक्षाचे तिकीट नाही मिळाले तरी अपक्ष म्हणून लढणारच’, अशी गर्जना केलेल्या अनेकांची पंचाईत झाली. प्रभागातून निवडून येणे वाटते तेवढे साेपे नसल्याने अनेकांनी तर आतापासून निवडणूक लढविण्याच्या विचारापासून फारकत घेतली आहे. तर कुठल्याही पक्षाचे लेबल नसलेले मात्र समाजकारणात सक्रीय असलेल्या काहींनी एकपेक्षा जास्त पक्षांशी संपर्क ठेवण्यास सुरूवात केली आहे.
नगर परिषद असाे की महा नगरपालिका. या निवडणुकीवर आमादारकी, खासदारकीच्या निवडणुकीचे समिकरण अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे जिल्हास्तरीय नेतृत्व जिल्ह्यातील अशा महत्वाच्या स्थानिक स्वाराज्य संस्था आपल्या ताब्यात ठेवण्याची प्रयत्नवत असते. उस्मानाबाद ही ‘अ’ वर्ग पालिका आहे. जिल्ह्यातील अन्य पालिकांच्या तुलनेत अधिक निधी मिळताे. सध्या या पालिकेत राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्यांची संख्या अधिक असली तरी नगराध्यक्षांच्या रूपाने सत्तेच्या चाव्या अकरा नगरसेवक असलेल्या शिवसेनेच्या हाती आहेत. दरम्यान, काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या पालिका निवडणुकीनंतर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकला जावा, यासाठी काही महिन्यांपासून सर्वच प्रमुख पक्षांकडून तयारी करण्यात येत आहे. सर्वांच्या नजरा लागलेल्या या निवडणुकीच्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी शासनाने ‘एक वाॅर्ड एक नगरसेवक’ असे सूत्र जाहीर केले हाेते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत अनेकांनी शड्डू ठाेकण्याची तयारी चालविली हाेती. काहींनी तर तिकीट नाही मिळाले तरी अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असे जाहीरच करून टाकले हाेते. अशा इच्छूकांमध्ये तरूणांची संख्या आहे. या मंडळीने आपापल्या वाॅर्डात भेटीगाठीच्या माध्यमातून संपर्क वाढविण्यास सुरूवात केली हाेती. हे सर्व वेगाने पुढे जात असतानाच शासनाने पूर्वीचा निर्णय मागे घेत आता ‘एक प्रभाग, दाेन नगरसेवक’ असे समिकरण जाहीर केले आहे. त्यामुळे ‘वेळप्रसंगी स्व:बळावर लढू’ असे म्हणणारे अनेकजण एक पाऊल मागे आले आहेत. तर काहींनी स्वत:च्या पक्षाकडून तिकीट मिळाले नाही तर इतर ऐनवेळी अन्य पक्षांकडून मदत मिळावी, म्हणून आतापासूनच ‘संपर्क’ सुरू ठेवला आहे. काहींनी राज्यपातळीवरील नेत्यांकडे खेटे मारण्यास सुरूवात केली आहे. एकूणच उपराेक्त घडामाेडीमुळे भावी नगरसेवकांची झाेप उडाली आहे.
चाैकट....
पालिकेची सध्याची स्थिती...
उस्मानाबाद पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांची संख्या अधिक आहे. मात्र, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मनगटावरील घड्याळ काढून बाजुला ठेवत हाती कमळ घेतले. त्यामुळे त्यांना मानणारे नगरसेवक तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीत असले तरी ते भाजपात आहेत. सेनेचे संख्याबळ अवघे अकरा एवढे आहे. परंतु, नगराध्यक्षपद मकरंद राजेनिंबाळकर यांच्या रूपाने सेनेकडे आहे. म्हणजेच सत्तेच्या चाव्या सेनेच्या हाती आहेत. काॅंंग्रेसचे संख्याबळ अवघे दाेन एवढे आहे. तर भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडून आलेल्यांची संख्या अवघी आठ इतकी आहे.