मेडिकलमध्ये चोरी, २० हजार लंपास
उस्मानाबाद : उमरगा शहरातील एका मेडिकलमध्ये चोरी झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. येथील रेवणसिद्ध सुरेश पुजारी यांचे शहरात मेडिकल दुकान आहे. या दुकानाच्या शटरचे कुलूप सोमवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी तोडले. आत प्रवेश करून दुकानात ठेवलेले २० हजार रुपये या चोरट्यांनी पळवून नेले आहेत. याप्रकरणी रेवणसिद्ध पुजारी यांनी उमरगा ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रकने दिली बसला धडक, प्रवासी जखमी
उस्मानाबाद : सेालापूर-धुळे महामार्गावरील सिंदफळ शिवारात बस व ट्रकचा अपघात रविवारी रात्री झाला. राजस्थानचा रहिवासी असलेला ट्रकचालक आझाद असीम हा महामार्गावरून वाहन निष्काळजी चालवीत होता. यावेळी समोरुन जात असलेल्या एमएच २० बीएल २४७५ क्रमांकाच्या बसला त्याने ट्रकची पाठीमागून धडक दिली. या घटनेत वाशिम येथील प्रवासी नितीन रामउजागीर शर्मा हे जखमी झाले आहेत. शिवाय, बसचेही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सोमवारी मिश्रा यांनी तुळजापूर ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावठी दारु अड्ड्यावर पोलिसांची धाड
उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील डिग्गी शिवारात गावठी दारु अड्ड्यावर उमरगा पोलिसांनी सोमवारी धाड टाकली आहे. याठिकाणी अवैधरीत्या गावठी दारु बनविली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार धाड टाकली असता, तेथे संजय सोमला पवार, रमेश लक्ष्मण पुजारी, खलील मकबुल जमादार, लक्ष्मण रेखु पवार हे चौघे जण गावठी दारु बनवीत असल्याचे दिसून आले. त्यांना ताब्यात घेत छाप्याच्या ठिकाणाहून दारु निर्मितीचा १२० लिटर्स द्रवपदार्थ व १० लिटर्स गावठी दारु जप्त करून ते जागीच नष्ट करण्यात आले. याप्रकरणी उमरगा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बांधावरून जाण्याच्या कारणावरून मारहाण
उस्मानाबाद : सामाईक बांधावरून जाण्याच्या कारणावरून वाणेवाडी येथे हाणामारी झाली आहे. वाणेवाडी येथील शेषराव नामदेव पौळ हे सोमवारी दुपारी आपल्या शेतातील सामाईक बांधावरून जात होते. यावेळी तेथून जाण्याच्या संबंधाने त्यांचेच भाऊबंद सुभाष पौळ, रामेश्वर पौळ, मंगल पौळ या तिघांनी शेषराव पौळ यांना शिवीगाळ करून काठीने मारहाण केली, तसेच जिवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी शेषराव पौळ यांनी ढोकी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.