तुळजापूर (जि. धाराशिव) : लाईट गेल्याचा फायदा घेत स्वयंपाक घरात असलेल्या महिलेच्या डोळ्यांत मिरची पावडर टाकून, तोंड दाबून कपाटातील २ लाख २० हजार रुपये चोरट्यांनी पळविल्याची घटना सोमवारी सायंकाळी ७:३० वाजता तुळजापुरात घडली आहे. शहरातील वर्दळीच्या शुक्रवार पेठ भागातील पुजाऱ्याच्या घरी घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
तुळजापूर शहरातील शुक्रवार पेठ भागात राहणाऱ्या अर्पिता योगेश रोचकरी या सोमवारी सायंकाळी घरात एकट्याच होत्या. किचनमध्ये स्वयंपाक करीत असताना सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अचानक लाईट गेली. यावेळी अंधारात अनोळखी तीन ते चार व्यक्ती घरात शिरले. त्यापैकी एकाने पाठीमागून दोन्ही हात धरून डोळ्यांत मिरची पावडर टाकून तोंड दाबून धरले. यामुळे अर्पिता यांना आरडाओरडा सुद्धा करता आली नाही. लागलीच इतर चोरट्यांनी घरातील कपाट उघडून त्यातील सामान अस्ताव्यस्त टाकत लॉकरमध्ये ठेवलेले २ लाख २० हजार रुपये हस्तगत करून पळ काढला. याप्रकरणी अर्पिता रोचकरी यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
उपचारासाठी ठेवले होते पैसेअर्पिता यांचे पती योगेश रोचकरी आजारी आहेत. त्यांच्या उपचारासाठी ५०० रुपयांच्या ४४० नोटा एकत्र करून ही रक्कम कपाटात ठेवली होती. नेमकी हीच रक्कम चोरट्यांनी अंधारात घरात शिरून पळविली आहे.
नागरिक झाले संतप्तवर्दळीच्या भागात सायंकाळच्या वेळी चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर या भागातील नागरिक संतप्त झाले. त्यांनी कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचा दावा करीत काही काळ रस्त्यावरच ठाण मांडले होते. तसेच चोरट्यांनी स्वत: डीपीवरून वीजपुरवठा बंद करून चोरी केल्याचाही दावा या नागरिकांनी केला.