धाराशिव : एका खून प्रकरणात तीन आरोपींना १८ सप्टेंबर राेजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जी. ठुबे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या तिघांना प्रत्येकी ११ हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला असून, हा दंड न भरल्यास ११ महिने सक्तमजुरी भोगावी लागेल. हे प्रकरण नोव्हेंबर २०२१ मध्ये घडले होते.
अधिक माहिती अशी की, गणेशनगर येथील शिवशंकर कोरे यांनी त्यांचा मुलगा कृष्णा कोरे बेपत्ता असल्याची तक्रार ढोकी पोलिस ठाण्यात दाखल केली होती. याचदरम्यान, धाराशिव शहरातील आनंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गडदेवधरी शिवारात एका अज्ञात व्यक्तीचा नग्न अवस्थेतील मृतदेह सापडला. डीएनए तपासणीनंतर हा मृतदेह कृष्णा कोरे यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाचा तपास करत असताना, पोलिसांना कृष्णा कोरेच्या मोबाइलवरून हॉटेल मेघदूत, शिंगोली येथे ऑनलाइन पैशांचे व्यवहार झाल्याचे आढळले.
सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास केला असता, रमेश भगवान मुंडे, अमोल अशोक मुंडे (दाेघे रा. काेयाळा, ता. धारूर) आणि शिवशंकर हरिभाऊ इंगळे (रा. इंगळे वस्ती, ता. केज) हे तिघे आराेपी निष्पन्न झाले. चौकशीत असे समोर आले की, आरोपींनी कृष्णा कोरेला गाडीत बसवून त्याच्याकडून दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्याने नकार दिल्यावर लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर त्याला गडदेवधरी येथील मोकळ्या जागेत नेऊन दोरीने हात बांधले आणि त्याचा मोबाईल घेतला. आरोपींनी कृष्णाच्या मोबाईलवरून हॉटेलमध्ये २ हजार १०० रुपये आणि एका रिक्षाचालकाला ३ हजार ५०० रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. त्यानंतर, त्यांनी कृष्णाचा गळा दाबून व लोखंडी रॉडने मारहाण करून त्याला ठार केले.
पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी त्याचे कपडे काढले आणि मृतदेह तिथेच सोडून दिला. पाेनि. दराडे, चिंतले, पारेकर, बांगर यांनी तपास केल्यानंतर न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल करण्यात आले. हा खटला न्यायालयासमाेर उभा राहिला असता, जिल्हा सरकारी वकील महेंद्र बी. देशमुख यांनी या प्रकरणात एकूण २७ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. सादर केलेले पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने १८ सप्टेंबर राेजी तिन्ही आराेपींना दाेषी ठरवून जन्मठेप आणि ११ हजार रुपये दंडाची शिक्षा ठाेठावली.