तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील गोंधळवाडी येथे रविवारी दोन कुटुंबातील १० जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यात चार बालकांचाही समावेश आहे. यामुळे कोरोनामुक्त गोंधळवाडी गावातील रुग्णसंख्या आता १३ झाली आहे.
गेल्या वर्षभरापासून कोरोनामुक्त गाव म्हणून गोंधळवाडीकडे पाहिले जात होते. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यातदेखील ग्रामपंचायत, गावकऱ्यांनी यश मिळविले होते. परंतु, संसर्ग कमी झाल्यानंतर अचानक एका कुटुंबातील तिघे तर रविवारी दुसऱ्या कुटुंबातील आणखी १० जण कोरोनाबाधित आढळले. यात १० वर्षांच्या आतील चार बालकांचादेखील समावेश आहे. सोमवारी काटगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने गोंधळवाडीत येऊन ६० जणांची आरटीपीसीआर तर २० जणांची अँटीजेन चाचणी केली. तसेच ग्रामपंचायतीकडून जंतुनाशकाची फवारणीही करण्यात आली. सोमवारी दुपारी गटविकास आधिकारी प्रशांतसिंह मरोड, तालुका आरोग्य आधिकारी पवार यांनीही गावाला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी सरपंच राजाभाऊ मोटे, उपसरपंच गोपाळ मोटे, ग्रामसेविका शुभांगी देवकते, आरोग्य सेवक अरविंद भालेकर, टी. एस. माळी, एस. डी. सुरवसे, सारंग देशमुख, आशा कार्यकर्ती संगीता मोटे आदी यावेळी उपस्थित होते.