तामलवाडी : खरीप हंगामात पेरणी केलेल्या उडीद पिकाला पावसाच्या विलंबाचा मोठा फटका बसला. ऐन शेंगा लागताना पावसाने ओढ दिल्याने झाडाला चार-चारशेंगा लागल्या असून, तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) शिवारात एका उडीदाच्या बॅगला केवळ १० किलोचे उत्पादन पदरात पडले. यामुळे पेरणीचा खर्चही निघाला नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
सांगवी (काटी) शिवारात नारायण मगर यानी खरीप हंगामात उडीदाची एका बॅगची पेरणी केली. त्यासाठी खत औषधाचा वापर केला. पेरणी फवारणी, कापणी, मळणी यासाठी हजारोचा खर्च केला. शनिवारी कापणी केलेल्या उडीदाच्या काडाची यंत्राद्वारे मळणी केली. यावेळी ३० किलोच्या एका बॅगला केवळ १० किलोचा उतारा मिळाला. बाजारात उडीदाला ६ ते ७ हजार रुपये भाव असला तरी शेतकऱ्याचा पदरात उडीदाचा उतारा नगण्य पडत असल्याने खरीप हंगामातील उत्पादनाचे नियोजन कोलमडले आहे. दरम्यान,काही महिन्याच्या कालखंडानंतर पडलेल्या पावसाने उडीदाच्या शेंगातील बियाणाची झाडाला उगवण होत असल्याने त्याचाही फटका उडीद उत्पादक शेतकऱ्याना बसला आहे. उत्पादनात उतारा कमी अन् शेगातील बिया उगवू लागल्याने एकरी ८ ते १० क्विंटंल मिळणारा उतारा १० किलोवर आल्याने उत्पादनात ९९ टक्के घट आली आहे. उडीद पिकाचा विमा लागू करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
चौकट
सोयाबीनच्या उत्पादनात होणार घट
सोयाबीनच्या झाडाला फूल लागताना पावसाने दीड महिना ओढ दिली. त्यामुळे पावसाअभावी काही कृषी मंडळात २० हजार हेक्टर क्षेत्र करपून जात आहे. झाडाला लागलेल्या सोयाबीन शेंगात बियाणाची फुगवण झाली नसून, ५० टक्के शेंगा चोपट झाल्या आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादनात कमालीची घट येण्याची भीती उडीद पिकाच्या उत्पादनावरून व्यक्त केली जात आहे.