उस्मानाबाद : जिल्हा बँकेच्या कर्जात बुडालेल्या तेरणा सहकारी साखर कारखान्यास पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दीर्घ मुदतीवर भाडेतत्वाने देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पहिल्यांदा देण्यात आलेल्या मुदतीत चौघांनीच अर्ज नेले होते. त्यामुळे १० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. मात्र, मुदतवाढीनंतरच्या एका आठवड्यात नव्याने एकानेही अर्ज घेतलेला नाही.
उस्मानाबाद जिल्ह्याचे वैभव असलेला मराठवाड्यातील पहिला तेरणा सहकारी साखर कारखाना कर्जापोटी बंद पडला आहे. जिल्हा बँकेने कर्जवसुलीसाठी हा कारखाना खाजगी संस्थांना दीर्घ मुदतीने भाडेतत्वावर देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. पहिल्यांदा अर्ज विक्रीची मुदत ही १४ सप्टेंबर ठेवण्यात आली होती. मात्र, या कालावधीत ट्वेंटी वन शुगर्स, डीडीएन-एसएफए, धाराशिव व मेयर कमोडिटीज या चार संस्थांनीच अर्ज घेतले. दरम्यान, स्पर्धा वाढावी यासाठी बँकेने अर्ज विक्रीच्या मुदतीत १० दिवस वाढवून २४ सप्टेंबरपर्यंत अर्ज विक्री सुरु ठेवली आहे. मात्र, या मुदतवाढीनंतरही अर्ज घेण्यासाठी कोणी फिरकलेले नाही. आता आणखी तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. या कालावधीत काणी अर्ज घेतो का, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, २४ तारखेला जिल्हा बँक कोणता निर्णय घेते, हे पाहणेही औत्सुक्याचे आहे. अर्ज विक्रीला पुन्हा मुदतवाढ देण्यात येते की, भरण्यात आलेल्या निविदांतूनच एखादी संस्था निवडण्यात येते, यावरही कारखाना चालू हंगामात सुरु करण्याच्या प्रयत्नांचे भवितव्य अवलंबून आहे. गतवर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे तेरणेच्या पट्ट्यात उसाची लागवड वाढली आहे. यामुळे स्वाभाविकच सभासदांचे लक्ष या निविदा प्रक्रियेकडे लागून आहे.
कोण हलविणार पाळणा...
तूर्त तेरणा कारखाना सुरु करण्यासाठी चार संस्थांनी इंटरेस्ट दाखविला आहे. पुढच्या तीन दिवसांत आणखी अर्ज नाही आले तर मग बँक या चौघांतून एखाद्याची निवड करते का, हा महत्वाचा प्रश्न आहे. सध्यातरी तेरणेच्या पाळण्याची दोरी चार संस्थांच्या हाती असल्याचे दिसून येते. यापैकी कोणाच्या दोरीने हा पाळणा हलतो, याकडे जशा सभासदांच्या नजरा आहेत, तशाच त्या राजकीय पुढारींच्या आहेत.