उस्मानाबाद : पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांची गुरुवारी निघालेल्या आदेशानुसार येथून बदली झाली आहे. आता ते मुंबईत उपायुक्त म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. दरम्यान, उस्मानाबादेत त्यांनी आपल्या ‘इन्वेस्टिगेटिव्ह’ कौशल्याने चांगला ठसा उमटविला होता.
राज तिलक रोशन यांना उस्मानाबादेत येऊन दोन वर्षे पूर्ण झाली. नियमानुसार ते बदलीस पात्र होते. गुरुवारी गृह विभागाने पोलीस अधीक्षक, अपर अधीक्षक व उपाधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार उस्मानाबादचे अधीक्षक रोशन यांची मुंबईला उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांनी उस्मानाबादच्या कारकीर्दीत हरवलेल्या बालकांना शोधण्याची मोहीम प्राधान्यक्रमावर घेऊन या उपक्रमात राज्यात अव्वल कामगिरी करून दाखवली. तपास कामावर विशेष लक्ष देऊन अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळवले. उस्मानाबाद ग्रामीण हद्दीतील तरुणीच्या खुनाचा केवळ टी-शर्टवरून छडा लावत आरोपींना गजाआड करून त्यांना जन्मठेपेपर्यंत पोहोचविले. या तपासाबद्दल त्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचा पुरस्कारही मिळाला.
दरम्यान, येथील अपर अधीक्षक संदीप पालवे यांचीही बदली औरंगाबादला झाली आहे. ते आता तेथील दहशतवाद विरोधी दलाचे नेतृत्व करणार आहेत.
उमरगा व तुळजापूर येथील उपाधीक्षकांचीही बदली करण्यात आली आहे. याठिकाणी आता नवे अधिकारी येत आहेत.