उमरगा : तालुक्यातील बोकाळलेले जुगार, मटका, गुडगूडी, हातभट्टी, डान्स बार व डुप्लिकेट डिझेल आदी अवैध धंदे, त्वरित बंद करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली.
शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात जुगार क्लब चालवले जात असून, बाहेरील राज्यातील लोक देखील येथे जुगार खेळण्यासाठी येत आहेत. मटका बुकिंनी गावागावात पाळेमुळे रुजवली असून, यामुळे लाखो कुटुंब बरबाद होत आहेत. गुडगुडी जुगाराने तर एका क्षणात कुटुंब रस्त्यावर येत आहे. उमरगा शहर व ग्रामीण भागातील अनेक गावात हातभट्ट्या राजरोस चालवल्या जात असून, हजारो कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. बाहेरील राज्यातील अवैध व्यावसायिक तालुक्यात विविध ठिकाणी डुप्लिकेट डिझेल विक्री करत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर राष्ट्रवादी युवक जिल्हा कार्याध्यक्ष बाबा जाफरी, युवक तालुका अध्यक्ष शमशोद्दीन जमादार, ग्रंथालय विभागाचे राज्य कार्यकारिणी सदस्य जगदीश सुरवसे, शहराध्यक्ष सुशील दळगडे, तालुका उपाध्यक्ष भैया शेख, विद्यार्थी तालुकाध्यक्ष समर्थ सुरवसे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष हाजी सय्यद, बंजारा सेल जिल्हा उपाध्यक्ष प्रताप राठोड ,अल्पसंख्यांक युवक शहराध्यक्ष फय्याज पठाण, उपाध्यक्ष मोहसिन पटेल, अनिकेत तेलंग, संकेत कुलकर्णी, भरत देडे, सतीश सरवदे आदींच्या सह्या आहेत.