उस्मानाबाद : जून महिन्यात रुग्णांची संख्या घटल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राज्यांतर्गत बससेवा रुळावर आली आहे. परराज्यात जाणाऱ्या बसेसही राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सुरू केल्या आहेत. उस्मानाबाद येथून हैदराबाद, सुरत या मार्गावर बसेस धावू लागल्या आहेत. या बसेसला प्रवाशांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. उस्मानाबाद येथून पणजी व बंगळुरू या मार्गांवर धावणाऱ्या बससेवा अद्याप बंद आहेत. या मार्गावरील बससेवा सुरु करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे. सध्या मुंबई, पुणे, औरंगाबाद या लांब पल्ल्याच्या बसेला गर्दी वाढली आहे. तसेच लातूर, सोलापूर मार्गावर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असल्याने बसफेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
हैदराबाद गाड्यांना संमिश्र प्रतिसाद
उस्मानाबाद येथून दररोज चार बसेस हैदराबाद मार्गावर धावत आहेत. सकाळी ७.३०, १०.३०, सायंकाळी ५.३०, रात्री ८.३० या वेळेत बसेस मार्गस्थ होत असतात. या बसेसला सध्या प्रवाशांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
उस्मानाबाद स्थानकातून
परराज्यात जाणाऱ्या बसेस
उस्मानाबाद - हैदराबाद
उस्मानाबाद - नाशिक - सुरत
उस्मानाबाद - कन्नड - सुरत
५० टक्के वाहक चालकांचे लसीकरण पूर्ण
बसचे चालक - वाहक दररोज हजारो प्रवाशांच्या संपर्कात येत असतात. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी काेरोनाचा धोका अद्याप पूर्णत टळलेला नाही. कोरोना संसर्गापासून बचाव व्हावा, यासाठी वाहक - चालक कोरोना प्रतिबंधात्मक लस घेत आहेत. उस्मानाबाद आगारातील ४२१ चालक - वाहकांपैकी सव्वादोनशे चालक - वाहकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
मास्कचा वापर बंधनकारक
उस्मानाबाद आगाराच्या चार बसेस हैदराबाद मार्गावर, दोन बसेस सुरत मार्गावर धावत आहेत. या बसेसला संमिश्र प्रतिसाद आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी बसेसचे अँटिमायक्रोबियल कोटिंग करण्यात आले आहे. तसेच बसमध्ये मास्कचा वापरही अनिवार्य करण्यात आला आहे.