धाराशिव : राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक शनिवारी जिल्हा दाैऱ्यावर आले असता, मराठा समाजाच्या तरूणांनी त्यांना घेराव घालत ताफा राेखून धरला. नाेंदणी असूनही कुणबी जात प्रमाणपत्रे मिळत नाहीत, तर मिळालेल्या प्रमाणपत्रांची व्हॅलिडिटी (जात वैधता) हाेत नाही, अशा शब्दात संताप व्यक्त केला. तरूणांचा हा संताप लक्षात घेवून त्यांनी मंत्री संजय सिरसाट यांना जागेवरूनच फाेन केला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबतीत तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले.
मराठा आरक्षणाचे नेते मनाेज जरांगे पाटील यांच्या लढ्यानंतर नाेंदी असणाऱ्या कुणबी जात प्रमाणपत्रे देण्यात येवू लागली. सुरूवातीला ही प्रक्रिया गतिमान हाेती. परंतु, सध्या कासवगती आली आहे. तर दुसरीकडे ज्यांना प्रमाणपत्रे मिळाली आहेत, त्यांची व्हॅलिडिटी करून मिळत नाही. शैक्षणिक आणि इतर लाभांपासून विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मराठा समाजातील तरूणांनी शनिवारी राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री जिल्हा दाैऱ्यावर असतानाच शिंगाेली सर्किट हाऊस परिसरात त्यांना राेखले. घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती केली. आश्वासन देण्याचा प्रयत्नही केला. परंतु, तरूण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. प्रत्येक वेळी आश्वासन मिळते अन् नेते निघून गेल्यानंतर पुढे काहीच हाेत नाही, अशा शब्दात राेष व्यक्त केला. तरूण ऐकण्याच्या मनस्थित नसल्याचे लक्षात आल्यानंतर पालकमंत्री सरनाईक यांनी थेट मंत्री सिरसाट यांना फाेन केला. मराठा तरूणांचा हा प्रश्न त्यांच्या कानावर घातला. तसेच जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनाही यात लक्ष घालून तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले.
१५ मिनिटे रस्ता राेखून धरला...‘‘आमचे प्रश्न साेडवा, मगच रेस्ट हाऊसमध्ये जा’’, असा पवित्रा घेत मराठा समाजातील संतप्त तरूणांनी मंत्री सरनाईक यांना घेराओ घातला. जवळपास पंधरा मिनिटे त्यांचा रस्ता राेखून धरण्यात आला.