भूम : गेल्या २२ दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यातून मिळणाऱ्या उत्पन्नाची आशा संपल्याने तालुक्यातील आष्टा येथील शेतकरी तथा हभप सतीश कदम महाराज यांनी पाच एकर सोयाबीन व चार एकर उडीद पिकावर रोटाव्हेर फिरवला.
आष्टा शिवारात शेतकरी कदम महाराज यांची शेती आहे. यंदा खरीप हंगामाच्या प्रारंभी चांगला पाऊस झाल्याने या शिवारात सोयाबीन व उडीदाची पिके चांगली बहरली. त्यामुळे यातून चांगले उत्पन्न होईल अशी आशा होती. परंतु, २२ जुलैपासून पावसाने खंड दिल्याने पिकांनी पाण्याअभावी माना टाकल्या आहेत. सोयबीनला कळ्या लागल्या होत्या. परंतु, पाण्याअभावी त्याही गळून पडल्या. असे असतानाही शेतकरी कदम यांनी तुषार सिंचनाच्या माध्यातून पाणी देण्याचा प्रयत्न केला. परंतु, तोपर्यंत कळ्या गळून पडून पिके वाळून गेली होती. पाणी दिले तरी पिकांची वाढच खुंटल्याने त्यांनी १४ ऑगस्ट रोजी चक्क रोटाव्हेर फिरवून रान मोकळे केले.
तालुक्यात २३ दिवसांपासून पाऊस नसल्याने प्रत्यक्षात पेरणी झालेली खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. आता पाऊस पडला तरी या पिकास उपयोग होणार नसल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे खरीप हंगामावर शेतकऱ्यांनी रंगविलेली सगळी स्वप्ने धुळीस मिळाली असून, बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.
कोट......
पेरणीसाठी रान तयार करण्यापासून ते पिके बहरात येईपर्यंत मोठ्या प्रमाणात खर्च झाला. फवारणीसाठी जास्तीचे पैसे घालवले. परंतु, पाऊस न झाल्याने पिके जळून गेली. यातून उत्पन्नच मिळणार नसल्याने शेवटी सर्व पिकावर रोटाव्हेर फिरवला.
- सतीश कदम महाराज, शेतकरी