इंधन दरवाढीमुळे रिक्षाचालक आर्थिक अडचणीत
उस्मानाबाद : गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढत आहेत. त्याबरोबरच आता पेट्रोल, डिझेलच्या दरातही प्रतिदिन वाढ होऊ लागली आहे.
सध्या पेट्रोल ९३, तर डिझेल ८२ रुपयांवर पोहोचले आहे. याचा फटका हातावर पोट असलेल्या रिक्षाचालकांना बसत आहे. अनेक रिक्षाचालकांना इतर व्यवसाय स्वीकारावे लागत आहेत.
मार्च महिन्यात लॉकडाऊन लागू झाल्याने उद्योग, व्यवसाय ठप्प झाले होते. त्यासोबतच खाजगी वाहतूक सेवाही बंदच होती. लॉकडाऊनमधील दोन महिने रिक्षाची चाके थांबली होती. त्यामुळे रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ ओढवली होती. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मे महिन्यापासून रिक्षा वाहतुकीस परवानगी दिली. रिक्षा सुरू झाल्यानंतरही दोन ते तीन महिने प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. दिवाळीनंतर कोरोनाचे रुग्ण घटू लागल्याने वाहतूक व्यवसायही पूर्वपदावर येऊ लागला. मात्र, पेट्रोल, डिझेलचे दर दिवसागणिक वाढू लागल्याने रिक्षाचालकांना पुन्हा आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. सध्या पेट्रोल ९३, तर डिझेलचा दर ८२ इतका झाला आहे. इंधन दरवाढीमुळे रिक्षाचालक पुन्हा अडचणीत सापडले आहेत. इंधन दरवाढ कमी करावी, अशी मागणी रिक्षाचालकांतून होत आहे.
पॉईंटर...
पेट्रोल
१ डिसेंबर ८९.५४
१ जानेवारी ९०.८४
१ फेब्रुवारी ९३.२९
डिझेल
१ डिसेंबर ७८.३२
१ जानेवारी ८९.२१
१ फेब्रुवारी ८२.४८
जिल्ह्यातील रिक्षा
पेट्रोल रिक्षा ३१३६
डिझेल रिक्षा १७८७
दरवाढीचा व्यवसायावर परिणाम काय झाला
इंधन दरवाढीमुळे ॲाटोरिक्षा संघटनांनी रिक्षाभाडे वाढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रवाशांतून भाडेवाढीस प्रतिसाद मिळत नसल्याने रिक्षा थांबवून ठेवाव्या लागत होत्या. पूर्वीचे भाडे आकारल्यास रोजगारही हाती पडत नाही. गतवर्षी आठ तास रिक्षा चालवल्यानंतर ६०० रुपये धंदा होत होता.. त्यातील २०० रुपये इंधनासाठी, तर ४०० रुपये रोजगार मिळत होता. मात्र, सध्या १० तास रिक्षा चालवूनही २०० रुपये हाती पडत नसल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले.
पैसे उरत नसल्याने करावे लागतेय इतर काम
दिवसातील आठ तास रिक्षा चालवल्यास २०० रुपये हाती उरत आहेत. यातून घरखर्च, मुलांचे शिक्षण, दवाखाना अशा गोष्टींसाठी पैसा अपुरा पडत असतो. त्यामुळे अनेक रिक्षाचालकांनी रिक्षा चालवणे सोडून भाजी विक्री करणे, किराणा दुकान, मिठाईच्या दुकानावर काम करण्यास प्राधान्य देत आहेत.
प्रतिक्रिया...
लॉकडाऊनमध्ये रिक्षा दोन महिने बंद होती. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. सध्या वाहतूक सुरू आहे. मात्र, पेट्रोल, डिझेलचे दर झपाट्याने वाढत आहेत. त्या तुलनेत व्यवसाय कमी आहे. १२ तास काम करून ३०० रुपये रोजगार मिळत आहे.
अमर शिंदे, रिक्षाचालक
लॉकडाऊनचा रिक्षाचालकांना आर्थिक फटका बसला आहे. त्यातच आता
इंधनाचे दर वाढत असल्याने ऑटोरिक्षा चालवणे न परवडणारे आहे. यातून मार्ग काढण्याकरिता भाडेवाढ करण्यात आली होती. मात्र, प्रवाशांतून भाडेवाढीस प्रतिसाद मिळत नाही.
जमाल तांबोळी,
अध्यक्ष ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना
पेट्रोलचा भाव ९३ रुपयांच्या पुढे गेला आहे. दिवसाकाठी रिक्षाला ३०० रुपयांचे पेट्रोल लागते. त्यातून केवळ २०० रुपये हाती उरत आहेत. शासनाने पेट्रोल, डिझेलचे दर कमी करावे.
लजिब मोमीन, रिक्षाचालक
अतिरिक्त प्रभारामुळे जातपडताळणीत खोळंबा
उस्मानाबाद : येथील सामाजिक न्याय भवन इमारतीत जातपडताळणीचे स्वतंत्र कार्यालय सुरू झाल्यापासून विद्यार्थी, निवडणूक लढविणारे उमेदवार व कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, सध्या कार्यालयात अपुरे मनुष्यबळ व अध्यक्ष, उपायुक्तांकडे असलेल्या अतिरिक्त प्रभारामुळे प्रकरणे निकाली काढण्यात विलंब होत आहे.