कळंब : मराठवाड्यासह उस्मानाबाद जिल्ह्यातील गायरान जमिनी गायरानधारकांच्या नावे कराव्यात, जिल्ह्यातील निवासी अतिक्रमणे कायम करावीत, या मागणीसाठी लाल पँथर संघटनेच्या वतीने रविवारी कळंब उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भाई बजरंग ताटे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.
शहरातील तहसील कार्यालय ते सावरकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुढे मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आला. येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून घोषणाबाजी करीत पुढे अण्णाभाऊ साठे चौक ते तहसील कार्यालयावर गेला. येथे मोर्चाचे रूपांतर आंदोलनात होऊन उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय परिसरात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
मोर्चाला शिराढोण येथील ताजखाँ पठाण प्रतिष्ठान व महाराष्ट्र क्रांती सेना यांनी जाहीर पाठिंबा दिला. या वेळी बजरंग ताटे, जिल्हाध्यक्ष माया शिंदे, मानवहित पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटुळे, समाधान डोंगर, लहुजी सेनेचे बालाजी गायकवाड, पांडुरंग कदम, धनंजय ताटे, ज्येष्ठ नेते रामकृष्ण कांबळे यांची भाषणे झाली.
अशा आहेत मागण्या...
उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व गायरान जमिनी गायरानधारकांच्या नावे कराव्यात, कडकनाथवाडी येथील स्मशानभूमीची वहिवाटीनुसार नोंद करावी, सर्व महामंडळे चालू करून ५ लाखांपर्यंत कर्ज द्यावे, कळंब येथील शासकीय विश्रामगृहात समोर असलेल्या शाॅपिंग सेंटरला अण्णा भाऊ साठे यांचे नाव द्यावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
आमदार पाटील यांची भेट
या मोर्चाला आमदार कैलास पाटील यांनी भेट दिली असता बजरंग ताटे यांनी त्यांच्याकडे आपण विधानसभेत या गायरान जमिनीबाबत प्रश्न उपस्थित करावा, अशी मागणी केली. यावेळी आमदार पाटील यांनी शिराढोण व कळंब येथील मागण्यांसंदर्भात कळंबचे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना पत्र देऊन सूचना देतो, अशी माहिती दिली. या मोर्चात कळंब तालुक्यातील सर्व गायरानधारक सहभागी झाले होते.