धक्कादायक -महिलेने घेतली परंडा पाेलिसांत धाव
परंडा : जमीन मिळकतीच्या वादाचा न्यायालयात खटला सुरू आहे. साेबतच संबंधित जमीन खरेदी-विक्रीस न्यायालयाचा मनाई आदेश आहे. असे असतानाही न्यायालयाचा मनाई आदेश डावलून जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला. हा प्रकार समाेर आल्यानंतर संबंधित महिलेने परंडा पाेलिसांत धाव घेतली.
पती अनिल नरहरी काटकर हे पत्नी जयश्री अनिल काटकर यांचा सांभाळ करत नसल्याने पत्नी जयश्री यांनी २०१५ मध्ये परांडा न्यायालयात सिरसाव येथील गट नं. ४९७ पैकी अनिल काटकर यांच्या नावावरील क्षेत्र ००.५७ आर. वडिलोपर्जित जमीन व सिरसाव येथील ग्रामपंचायत मिळकत नं. ५१६ ज्याचे एकूण क्षेत्रफळ ७४४ चौरस फूट घर जागा वाटून मिळावी म्हणून मागणी हाेती. प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत शेती, घर, जागेची विक्री केली जावू नये म्हणून न्यायालयाकडे स्टे मागितला हाेता. सध्या हे न्यायालयात सुरू असून, ३१ जानेवारी २०१७ रोजी न्यायालयाने सदरचा अर्ज निकाली काढून या दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत अनिल नरहरी काटकर यांच्या नावावरील क्षेत्र ००.५७ आर. व सिरसाव येथील ४७४ चौरस फूट घर जागा कोणालाही खरेदी-विक्री किंवा हस्तांतर करू नये, असा मनाई हुकुम अनिल काटकर यांच्याविरोधात पारित केला. या मनाई हुकूमाची प्रत २३ जून २०१७ रोजी दुय्यम निबंधक अधिकारी यांच्याकडे सुपूर्त केली. या कार्यालयाची रितसर पाेहोचपावतीही घेतली. असे असतानाही अनिल काटकर, दुय्यम निबंधक व्ही. डी. बारवकर, साक्षीदार बिभीषण चोबे, प्रताप चोबे यांनी संगनमत करून २२ एप्रिल २०२१ रोजी सिरसाव येथील जमीन गटक्रमांक ४९७ पैकी ००.५७ आर. आकार ०१ रु २४ पैसे या जमिनीची मनाई आदेश डावलून खरेदी-विक्री केली, अशी तक्रार जयश्री काटकर यांनी परंडा पाेलिसांत दिली. या प्रकरणात सहभागी असलेल्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कोट....
जमिनीची खरेदी-विक्री झाल्याचे समजल्यानंतर मी दुय्यम निबंधक व्ही. डी. बारवकर यांची भेट घेतली. मनाई आदेश असतानाही संबंधित जमिनीची खरेदी-विक्री कशी केली, अशी विचारणा केली. मात्र, त्यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर न देता, ‘तुम्हाला जिथे जायचे तिथे जा’, असे म्हणत कार्यालयातून हाकलून दिले. त्यामुळेच मी परंडा पाेलीस ठाण्यात धाव घेऊन रितसर तक्रार दिली आहे.
- जयश्री अनिल कारकर.
संबंधित दस्त नाेंदणी करत असताना खरेदी लिहून देणार अनिल काटकर व दस्त लिहिणारे सुरेश डाेके यांनी काेर्टातील वाद मिटल्याचे सांगितले. त्यामुळे मी दस्त नाेंदणीसाठी घेतला. संबंधित महिलेने यासंदर्भात तक्रार केली असता, सर्व कागदपत्रांची छाननी केली. त्यावर जमीन खेरदी-विक्रीस काेर्टाची मनाई असल्याचे समाेर आले. खरेदी देणारा व दस्त लिहिणाऱ्याने माझी दिशाभूल केली.
-व्ही. डी. बारवकर, दुय्यम निबंधक, परंडा.