रेशन दुकानाचा परवाना रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:33 AM2021-02-16T04:33:40+5:302021-02-16T04:33:40+5:30

उमरगा : तालुक्यातील बलसूर येथील रास्त भाव धान्य दुकानाच्या तपासणीत अनियमितता, धान्याचा अपहार करण्याच्या हेतूने आश्रमशाळेच्या गोदामात धान्यसाठा ठेवल्याचे ...

Ration shop license revoked | रेशन दुकानाचा परवाना रद्द

रेशन दुकानाचा परवाना रद्द

googlenewsNext

उमरगा : तालुक्यातील बलसूर येथील रास्त भाव धान्य दुकानाच्या तपासणीत अनियमितता, धान्याचा अपहार करण्याच्या हेतूने आश्रमशाळेच्या गोदामात धान्यसाठा ठेवल्याचे आढळून आल्याने तहसीलदार संजय पवार यांनी १० नोव्हेंबरला पंचनामा करून दुकान परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे पाठविला होता. सुनावणीदरम्यान दुकानदाराकडून समाधानकारक खुलासा, उत्तरे न मिळाल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. चारूशीला देशमुख यांनी या दुकानदाराचा परवाना रद्द केला.

एस. जी. चव्हाण यांचे बलसूर येथे शासनमान्य रास्त भाव धान्य दुकान आहे. सदरचे दुकान बलसूर तांडा येथील घर क्रमांक ९८ मध्ये आहे. परंतु, चव्हाण यांनी विनापरवाना दुकानाची जागा बदलून एप्रिल २०२० पासून जवळच असलेल्या आश्रमशाळेच्या गोदामामध्ये अनधिकृतपणे धान्य साठवून व वितरण केले असल्याची माहिती १० नोव्हेंबरला बलसूर ग्रामस्थांनी पुरवठा विभागाला दिली होती. यानुसार तत्कालीन नायब तहसीलदार (पुरवठा) विलास तरंगे यांनी प्रत्यक्ष जाऊन तपासणी केली असता अनधिकृत गोदामात धान्यसाठा आढळून आल्याने गोदाम सील करून दुकानदार चव्हाण यांना नोटीस देऊन खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, यावेळी संबंधित रास्त भाव दुकानदारास दिलेले एकूण नियतन व त्यांनी वितरित केलेले ऑनलाईन धान्याचा ताळमेळ घेतला असता रास्त भाव दुकानात काही धान्य जास्तीचे आढळून आले होते. हे धान्य लाभार्थ्यांना वितरित न करता गोदामात साठवून ठेवल्याचे निदर्शनास आल्याने शासन निर्णय १२ डिसेंबर १९९१ नुसार रास्त भाव दुकान परवाना रद्द करण्याबाबतचा अहवाल पंचनाम्यासह जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तहसीलदार पवार यांनी पाठविला होता. दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. चारूशीला देशमुख यांनी या प्रकरणाची शहनिशा करून दुकान परवाना रद्द केला आहे. तसा आदेश सोमवारी तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे.

Web Title: Ration shop license revoked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.