तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील काटी येथे गुरुवारी ३३ केव्ही ट्रान्सफाॅर्मरवर वीज पडल्याने ट्रान्सफॉर्मर जळाला आहे. त्यामुळे काटीसह या विद्युत उपकेंद्रावर अवलंबून असणारी चार गावे तीन दिवसांपासून अंधारात आहेत.
काटी वीज उपकेंद्रावर काटीसह खुंटेवाडी, वाणेवाडी, नरसिंह तांडा या गावांना घरगुती व शेतीसाठी वीजपुरवठा केला जातो. गुरुवारी रात्री झालेल्या पावसात उपकेंद्र परिसरात वीज कोसळून ट्रान्सफाॅर्मर जळाला. यामुळे सध्या चारही गावांचा वीजपुरवठा बंद आहे. याबाबत विद्युत महावितरणचे अभियंता कावरे यांच्याशी संपर्क साधला असता नवीन ट्रान्सफॉर्मर सध्या उपलब्ध नसल्याने पर्यायी व्यवस्था करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, तीन दिवसांपासून वीजपुरवठा बंद असल्याने मोबाइलच्या बॅटऱ्या डिस्चार्ज झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणाचे तीनतेरा वाजले आहेत. शिवाय, नागरिकांचा संपर्कही बंद आहे. दळण, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. घरातील विद्युत उपकरणेही नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
चौकट
काटी गावातील ट्रान्सफाॅर्मर बंद पडला असून, नवीन ट्रान्सफॉर्मर तत्काळ उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. सध्या पर्यायी व्यवस्था करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच वीजपुरवठा सुरळीत होईल.
- पी. एन. कावरे, शाखा अभियंता, माळुंब्रा वीज उपकेंद्र