उस्मानाबाद : मागील काही दिवसांपासून पेट्रोल तसेच डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला आर्थिक ताण पडत आहे. तर दुसरीकडे विमानासाठी लागणाऱ्या एटीएफ इंधनाचा भाव प्रति लीटर ६० रुपये इतका आहे. विमानात वापरण्यात येणाऱ्या इंधनापेक्षा पेट्रोल महाग झाल्याचे सांगितल्यास विश्वास बसणे कठीण आहे. पण, हे खरे आहे. उस्मानाबाद शहरात पेट्रोलचा भाव प्रति लीटर १०८ रुपयांपर्यंत तर डिझेलचा भाव प्रति लीटर ९७ रुपयांच्या घरात पोहोचला आहे. दुसरीकडे विमानासाठी लागणाऱ्या एटीएफ म्हणजेच एव्हिएशन टरबाइन फ्युल या इंधनाचा भाव प्रति लीटर ६० रुपये इतका आहे. परिणामी, सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर पेट्रोल आणि डिझेलचे भाव जात असल्याने वाहन चालविणे सोडायचे काय, असा प्रश्नही मनात निर्माण होत आहे.
कोरोनामुळे खर्चात भर, पाचशेच्या ठिकाणी लागतात हजार रुपये
कोरोनामुळे मागील दीड वर्षात तीन ते चार महिने उद्योग, व्यवसाय पूर्णपणे बंद होते. वाहतूक व्यवस्था काही महिने ठप्पच होती. त्यामुळे हातावर पोट असलेली कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली होती. मध्यमवर्गीयांना आर्थिक झळ सोसावी लागली. त्यातच आता महागाईने चांगलीच भर टाकली आहे. ज्या ठिकाणी पाचशे रुपये खर्च होता त्या ठिकाणी आता १ हजार रुपये खर्च होत आहेत. त्यामुळे इंधन दर कमी करून सामान्यांना काेरोना काळात तरी दिलासा देणे गरजेचे झाले आहे.
पगार कमी, खर्चात वाढ
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल व डिझेलचे दर प्रतिदिन वाढतच आहेत. त्यात वाहनांना भाडे कमी प्रमाणात मिळत आहेत. शासनाने सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून किमान इंधन दर कमी करावे. यामुळे महागाई नियंत्रणात येईल.
अमन शिंदे, वाहनचालक
गत दीड वर्षापासून कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. या काळात महागाई उच्चांक गाठत आहे. पेट्रोल, डिझेलचे दर भरमसाट वाढत आहेत. याचा परिणाम वाहतूक सेवेवर होत आहे. कोरोनापूर्वी टेम्पोला दिवसाकाठी ५ हजार रुपयांचे भाडे मिळत असे. इंधनाचा खर्च वगळून ३ हजार रुपये राहत होते. आता भाडेही नियमित मिळत नाही. मिळाले तरी इंधनासाठी अधिक खर्च होत आहे. त्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे.
आकाश सुरवसे, वाहनचालक
हा बघा फरक
विमानातील इंधन ए.टी.एफ. ६०
पेट्रोल १०८
शहरातील पेट्रोलपंपांची संख्या २२
दररोज लागणारे पेट्रोल ३२,३००