सुशील शुक्ला
परंडा : मागील काही वर्षांत पपई उत्पादनाचे आगर म्हणून ओळखल्या जाऊ लागलेल्या तालुक्यातील पाचपिंपळा परिसराला गेल्या आठवड्यात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. यामुळे शेकडो एकरातील पपईची रोपे अति पावसाने पिवळी पडून जळाली असून, यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
पाचपिंपळा परिसरात काही शेतकऱ्यांनी वेगळी वाट म्हणून पपईची लागवड सुरू केली होती. पपईचे चांगले उत्पादन होऊन पैसाही चांगला मिळू लागला. उत्तर प्रदेश, बिहार येथील परप्रांतीय व्यावसायिक पाचपिंपळा येथील पपईची खरेदी करण्यास जागेवर येऊ लागले. त्यामुळे इतरही अनेकांनी पपई लागवड करण्यास सुरुवात केली. सध्या पाचपिंपळा येथील प्रत्येक शेतकऱ्याकडे दोन-चार एकरापर्यंत पपईच्या बागा आहेत. पपई खरेदीसाठी दिल्ली, मुंबई, हैद्राबाद येथील व्यापारी चार-सहा महिने परंड्यात राहून दररोज पपईची गाडी भरून पाठवतात. शिवाय, शेतकऱ्यांना जागेवरच वजन करून रोख रक्कम दिली जाते. त्यामुळे शेतकरी पपई उत्पादनाकडे वळले असून, पपई उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत. विशेष म्हणजे, पाचपिंपळा गावातील शेतकरी पपईची रोपे स्वत: तयार करून विक्री करीत आहेत.
दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने पपईची रोपे जळून होत्याचे नव्हते झाले आहे. प्रशासनाने नुकसानीचे त्वरित पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यातून केली जात आहे.
चौकट ...
मी तीन एकर क्षेत्रावर पपईची लागवड केली होती. रोपेही जोमात आली होती. यासाठी आतापर्यंत एक लाख रुपये खर्च झाला आहे. मात्र, मागील आठ-दहा दिवसांत पडलेल्या अतिवृष्टी, संततधार पावसामुळे पपईची झाडे जागेवर पिवळी पडून वाळून गेली आहेत. या पपईचे सात लाखांचे उत्पन्न निघाले असते. शासनाने नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.
- समाधान खुळे, शेतकरी, पाचपिंपळा
मी चार एकरात पपईची चार हजार रोपे लावली होती. परंतु, जास्त पाऊस झाल्याने रोपे पिवळी पडून वाळून गेली आहेत. ही रोपे आता येणार नाहीत. त्यामुळे माझे आठ लाखांपर्यंत निघणाऱ्या उत्पन्नाबरोबरच आतापर्यंत पपईच्या बागा संभाळण्यासाठी केलेला लाख-दीड लाखाचा खर्चही वाया गेले आहे.
- रत्नाकर जाधव, शेतकरी, पाचपिपंळा