तुळजापूर दुसऱ्या स्थानावर - जिल्ह्यातील १ लाख १६ हजार खातेदारांच्या पीक पेऱ्याच्या नाेंदी पूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरलेल्या पिकाची नाेंद अचूक व्हावी, यासाठी ॲपच्या माध्यमातून नाेंदी घेण्यात येत आहेत. यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत डेडलाईन देण्यात आली आहे. परंतु, वेगवेगळ्या तांत्रिक अडचणी येत असल्याने ही माेहीम अपेक्षित गतीने सुरू नसली तरी आजवर सुमारे १ लाख १६ हजार ९५७ शेतकऱ्यांच्या पीक पेऱ्याच्या नाेंदी पूर्ण झाल्या आहेत. हे प्रमाण २५ टक्के असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामध्ये सर्वाधिक ३३ हजार १४० शेतकरी एकट्या उस्मानाबाद तालुक्यातील आहेत.
नजर पीक पाहणी, नजर पैसेवारी या पाहणी पद्धतीवर कायमच प्रश्नचिन्ह लावले जाते. अतिवृष्टी, पीक विमा, पीक कापणी प्रयोगावेळी एकूण पेरणी क्षेत्र, पीक लागवड याचे अंदाज चुकू शकतात. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांना मदत मिळवून देताना हाेताे. हीच बाब लक्षात घेऊन शासनाने प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातील पिकांची नाेंद, क्षेत्रफळ आदींच्या नाेंदीसाठी स्वतंत्र ॲप उपलब्ध करून दिले आहे. परंतु, या माध्यमातून नाेंदी घेताना वेगवेगळ्या तांत्रिक अडचणींना ताेंड द्यावे लागत आहे. अशा अडथळ्यांची शर्यत पार करत आजवर सुमारे ४ लाख ९ हजार ९९५ शेतकरी खातेदारांपैकी १ लाख १६ हजार ९५७ शेतकऱ्यांच्या पीक पेऱ्याच्या नाेंदी पूर्ण झाल्या आहेत. म्हणजेच हे प्रमाण २५ टक्के एवढे आहे. या नाेंदी घेण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे. ही संख्या आणखी वाढेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. या नाेंदीत उस्मानाबाद तालुक्याने अव्वल स्थान पटकावले आहे. तब्बल ३३ हजार १४० जणांनी नाेंद केली आहे. दुसऱ्या स्थानावर तुळजापूर तालुका आहे. येथील २३ हजार ६७६ शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. तर वाशी तालुक्याची अत्यंत खराब कामगिरी आहे. अवघ्या ७ हजार ३३५ खातेदारांच्या पीक पेऱ्याच्या नाेंदी झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हाती आणखी काही दिवस आहेत. प्रशासनाने पुढाकार घेत अधिकाधिक नाेंदी होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.