उस्मानाबादेत पत्नीच्या खूनप्रकरणी पतीसह चौघांना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 07:35 PM2018-10-30T19:35:58+5:302018-10-30T19:36:26+5:30
उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालयात दिपाली मारूती बानगुडे या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता़
उस्मानाबाद : परंडा तालुक्यातील वाकडी येथील एका महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देत खून केल्याप्रकरणी पतीसह चौघांना भूम येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिशांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ तसेच प्रत्येकी दोन हजार रूपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे़
याबाबत शासकीय अभियोक्ता शरद जाधवर यांनी दिलेली माहिती अशी की, उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालयात दिपाली मारूती बानगुडे या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता़ विवाहितेच्या मृत्यूनंतर तिच्या आईने २५ जानेवारी २०१७ रोजी जिल्हा रूग्णालयातील चौकी अंमलदाराकडे जबाब नोंदवून फिर्याद दिली होती़ विवाहितेचा पती मारूती शंकर बानगुडे, दीर अमोल शंकर बानगुडे, सासरा शंकर पांडुरंग बानगुडे व सासू छाया शंकर बानगुडे (सर्व रा़ वाकडी ता़परंडा जि़उस्मानाबाद) यांनी दिपालीचा जाच करून २२ जानेवारी २०१७ रोजी अंगावर रॉकेल ओतून पेटवून देत खून केल्याचे म्हटले होते़ या जबाबावरून परंडा पोलीस ठाण्यात उपरोक्त चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़ पोनि डी़ए़डंबाळे यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़
या प्रकरणाची भूम येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक दोन) आऱव्ही़उत्पात यांच्या समोर सुनावणी झाली़ या प्रकरणात सरकार पक्षाकडून सहा साक्षीदार तपासण्यात आले़ पीडितेचा दुसरा मृत्यूपूर्व जबाब, पंच, साक्षीदारांची साक्ष व परिस्थितीजन्य पुरावा व शासकीय अभियोक्ता शरद जाधवर यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्या़ आऱव्ही़ उत्पात यांनी चारही आरोपींना भादंविचे कलम ३०२ सह कलम ३४ अन्वये दोषी धरून जन्मठेप व प्रत्येकी दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़ दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावल्याचे अॅड़ जाधवर यांनी सांगितले़