वाशी : केंद्र सरकारच्या सोयाबीन आयातीच्या धोरणास विरोध करीत हा निर्णय रद्द करावा, यासह इतर मागण्यांबाबत काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकारने देशांतर्गत सोयाबीनचे वाढलेले दर पाहून परदेशातून १२ लाख टन सोयाबीन आयात करण्याचा निर्णय घेतला. परिणामी देशांतर्गत सोयाबीनचे दर अवघ्या आठ दिवसांत ११ हजारांवरून पाच रुपयांवर आले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा. तसेच मागील काही दिवसांत होत असलेल्या पावसामुळे सोयाबीन शेती पूर्ण पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे. शासनाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून तसेच प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना विमा रक्कम मंजूर करून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाई रक्कम वर्ग करावी, अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस श्यामराव भोसले, युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस अवधूत क्षीरसागर, महिला जिल्हा सरचिटणीस स्नेहल स्वामी, अमर तागडे, नथुराम गायकवाड, बाबा शिंदे, ब्रह्मानंद स्वामी, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.