भूम : तालुक्यात भूम शहरासह ५३ गावांत कोरोनाचा उद्रेक होऊ नये यासाठी विषेश खबरदारी म्हणून पोलीस ठाण्याच्या पुढाकारातून ५३ गावांसाठी येथील पोलीस ठाण्यात एकाच मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रात एक वेगळा पॅटर्न म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.
तालुक्यात दरवर्षी परवानगी घेऊन ४४, तर लहान मंडळांकडून ७७ गणेशमूर्तींची सार्वजनिक ठिकाणी प्रतिष्ठापना केली जाते. यासाठी पोलीस यंत्रणेकडून रीतसर ऑनलाइन परवाना दिला जातो. मात्र, कोरोनामुळे गतवर्षीपासून उत्सवावर मोठी बंधने आली आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी बहुतांश पोलीस ठाण्यांनी ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबविण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित केले आहे. येथील पोलीस ठाण्याने मात्र मागील वर्षीपासून ठाण्याअंतर्गत असलेल्या ५३ गावांसाठी एकच गणेशमूर्ती स्थापन करण्याचा आगळावेगळा पॅटर्न राबविला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या हस्ते भूम पोलीस ठाण्याच्या आवारात या सार्वजनिक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश साळवे, हभप अरुण शाळू महाराज, पत्रकर, पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या दहा दिवसांच्या काळात वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, भजन, हरिजागर, कीर्तन, प्रवचन, विद्यार्थी यांच्यासाठी स्पर्धा, आदी धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत.
विषेश म्हणजे तालुक्यातील सार्वजनिक गणेश मंडळास येथे आरतीसाठी मान दिला जात आहे. सार्वजनिक ठिकाणी गणेशाची प्रतिष्ठापना केल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी वाढली असती. यामुळे पोलीस ठाण्याने मागील वर्षीपासून ही संकल्पना अमलात आणली आहे. यंदाही ही संकल्पना राबवली आहे.
चौकट
यंत्रणेवरील ताण झाला कमी
कोरोनापूर्वी तालुक्यात ४४ सार्वजनिक ठिकाणी परवाना घेऊन गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होत होती. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर स्थापना झाल्यापासून विसर्जन सोहळ्यापर्यंत रात्री-अपरात्री जागरूक राहून सेवा करावी लागत होती. विशेषत: विसर्जन सोहळा यशस्वी करण्यासाठी डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावावे लागत होते. परंतु, मागील वर्षीपासून ५३ गावांसाठी एकच गणपती ही संकल्पना राबविल्याने पोलीस यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे.
कोट....
५३ गावांसाठी एकच गणपती ही संकल्पना राबविण्याबाबत तालुक्यातील सार्वजनिक मंडळांचे चांगले सहकार्य लाभले. शिवाय, सर्व मंडळांनी सार्वजनिक ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठापना केली असती तर गर्दी वाढून कोरोना संसर्गाची भीती होती. त्यामुळेच यंदाही हा निर्णय घेण्यात आला.
- मंगेश साळवे, सपोनि, भूम