उस्मानाबाद - स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी ‘ओडीएफ प्लस’ (हागणदारीमुक्त अधिक) या विषयावर घाेषवाक्य लेखन स्पर्धा सुरू केली आहे. यासाठी ग्रामपंचायतींना १ सप्टेंबर ते १५ ऑक्टाेबर असा कालावधी निश्चित केला आहे.
घाेषवाक्य लेखन स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना सहभाग नाेंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे. शौचालयाचा नियमित वापर, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, गोबरधन, ओला, सुका व प्लास्टिक कचरा विलगीकरण आदी घटकांच्या अनुषंगाने घाेषवाक्ये तयार करावी लागणार आहेत. ही घाेषवाक्ये गावातील दर्शनी ठिकाणी म्हणजेच सभागृह, सरकारी दवाखाने, बाजारपेठा, पोस्ट ऑफिस, बसस्थानक, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक इमारतींवर रंगवावी लागणार आहेत. गावात लिहिलेल्या घाेषवाक्यांची छायाचित्रे गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करावी लागणार आहेत. ही जबाबदारी ग्रामसेवक यांच्यावर साेपविण्यात आली आहे. यानंतर गटविकास अधिकारी सर्वाधिक घाेषवाक्ये लिहिलेल्या पहिल्या २० ग्रामपंचायतींना स्वत: भेट देणार आहेत. ही सर्व प्रक्रिया आटाेपल्यानंतर म्हणजेच २ ऑक्टाेबर राेजी जिल्ह्यातील पहिल्या तीन ग्रामपंचायतींची निवड करून त्यांचा गाैरव केला जाईल, तर १५ ऑक्टाेबर राेजी राज्यातील तीन जिल्ह्यांची निवड करून गाैरविण्यात येणार असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांनी सांगितले. जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी सहभाग नाेंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.