उस्मानाबाद शहराची हद्द औद्याेगिक वसाहतीपर्यंत वाढली आहे. हा परिसर डाेंगरी व निसर्गरम्य असल्याने लाेकवस्तीही झपाट्याने वाढत आहे. साेबतच प्रधानमंत्री ग्रामसडक याेजनेतून जुना उपळा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळे उपळा गावासह परिसरातील किणी, पवारवाडी, हिंगळजवाडी, तेरसह पळसप आदी गावांतील लाेक उपळा ते राष्ट्रीय महामार्ग हे पाच ते सहा किमीचे अंतर टाळण्यासाठी जुन्या उपळा रस्त्याने ये-जा करीत आहेत. विशेष म्हणजे, वाहनांची वर्दळ नसल्याने शेतकरी, शेतमजूर तसेच अन्य वाहनधारक याच रस्त्याला पसंती देत आहेत. मात्र, औरंगाबाद-साेलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना अंडरपास ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे या मार्गाने येणाऱ्या वाहनांना राँग साइडने उस्मानाबादेत प्रवेश करावा लागताे. असाच अनुभव शहरातून डी-मार्ट, पाेदार शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्या बाजूच्या रहिवाशांना येत आहे. या सर्वांनाच राँग साइडने प्रवास करावा लागत आहे. उतार अधिक असल्याने समाेरून येणाऱ्या वाहनांची गतीही अधिक असते. त्यामुळे अचानक राँग साइडने वाहन आल्यास चालकास नियंत्रण मिळविणे कठीण हाेते. परिणामी लहान-माेठे अपघात घडत आहेत. या घटनेनंतर विमा कंपनीकडे क्लेमची मागणी नाेंदविल्यास राँग साइडने प्रवास केला म्हणून क्लेम नाकारल्याच्या घटना घडल्या आहेत. उपराेक्त प्रश्न लक्षात घेता, या ठिकाणी किमान एका वाहनापुरता तरी अंडरपास करणे गरजेचे आहे. साेबतच रखडलेल्या सर्व्हिस राेडच्या कामालाही गती आवश्यक आहे. अंडरपास हाेत नसेल तर चाेराखळीप्रमाणे दाेन्ही बाजूच्या रहिवाशांसह वाहनधारकांना ये-जा करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. अन्यथा हा प्रश्न अधिक गंभीर बनू शकताे.
ना अंडरपास, ना सर्व्हिस राेडचा पत्ता...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:12 IST