तुळजापूर : मेजर थॅलेसिमिया आजारामुळे दर दोन आठवड्याला ‘ब्लड ट्रान्समिशन’ करण्याची वेळ येथील नऊ वर्षांच्या प्रतीक्षा अमर बनसोडे या चिमुकलीवर ओढावली आहे. यासाठीचा खर्च मोठा असून, या कामी दानशूर संस्था, व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन जिजामाता प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रतीक्षा अमर बनसोडे ही सहा महिन्याची असल्यापासून मेजर थॅलेसिमिया या आजाराने ग्रस्त आहे. यासाठी तिला दर दोन आठवड्याला ‘ब्लड ट्रान्समिशन’ करावे लागते. डॉक्टरांनी तिला बोनमॅरो ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला दिला असून, यासाठीचा खर्च तब्बल पंधरा लाख रुपये आहे.
हा खर्च बनसोडे कुटुंबीयाच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यामुळेच पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट संस्थेचे चेअरमन डॉ.जयप्रकाश राजेनिंबाळकर यांनी ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत मल्टिस्टेटमधील सर्व कर्मचारी, तसेच जिजामाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर शेळके यांच्या कन्या श्रद्धा यांच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली. समाजातील दानशूर व्यक्तींनीही अमर बनसोडे यांना त्यांच्या मुलीच्या उपचारासाठी आपापल्या परीने आर्थिक मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन यावेळी जिजामाता प्रतिष्ठानच्या वतीने शेळके यांनी केले.