उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील कदेर येथील एका तरुणास नाेकरीचे आमिष दाखवून अज्ञाताने सुमारे पावणेदाेन लाखांचा गंडा घातला. ही घटना ८ ते २३ डिसेंबर या कालावधीत घडली. या प्रकरणी शनिवारी (दि. २३) उमरगा पाेलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उमरगा तालुक्यातील कदेर येथील शुभम सुभाष औरादे या तरुणास ८ ते २३ डिसेंबर २०२० या कालावधीत तीन अनाेळखी भ्रमणध्वनी क्रमांकावरून फोन आले. फोन करणाऱ्या अज्ञातांनी शुभम यास नाेकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यापाेटी वेगवेगळे बहाणे बनवून दिलेल्या दाेन बॅंक खात्यात रक्कम भरण्यास सांगितले. यावर शुभम याने निष्काळजीपणा करून त्या फोनची सत्यता न पडताळता सांगितलेल्या दाेन बॅंक खात्यांत वेळाेवेळी तब्बल एक लाख ८० हजार ८५४ रुपये भरले. कालांतराने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर उमरगा ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध २३ जानेवारी राेजी भादंसंचे कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.