लोहारा ( जि. धाराशिव ) : घरगुती भांडणाच्या कारणावरून आईचा खून करून त्यास आत्महत्येचा बनाव केल्याची धक्कादायक घटना लोहारा शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुलगा व सुनेविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसाकडून मिळालेल्या माहिती अशी की, महेश सुरेश रणशुर (वय ३५, रा. लोहारा, ह.मु. शिवहरी ग्रीन सिटी, वापी, जि. वलसाड, गुजरात) यांनी लोहारा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, त्यांचे भाऊ सौदागर रणशुर व त्याची पत्नी पूजा रणशुर हे नेहमीच आई उमाबाई (वय ५५) यांच्याशी वाद घालत असत. पूर्वी देखील आईस मारहाण केल्याची घटना घडली होती. सोमवारी २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान सौदागर व पूजा रणशुर यांनी आई उमाबाई यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी संशियतला ताब्यात घेतले. त्यानंतर मंगळवारी २६ ऑगस्ट रोजी लोहारा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेनंतर आरोपींनी आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला होता. मात्र, त्याच दिवशी दुपारी फिर्यादीस सौदागर रणशुर याने पाठवलेला एक व्हिडीओ मोबाईलवर मिळाला. त्यात सौदागर व पूजा रणशुर हे आईस शिवीगाळ करून मारहाण करत असल्याचे स्पष्ट दिसून आले. या प्रकरणी लोहारा पोलिसांनी सौदागर रणशुर व पूजा रणशुर या दोघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे करीत आहेत.