तुळजापूर/उस्मानाबाद : ‘आम्ही माेहाेळ झाडायला आलाे आहाेत’, अशी बतावणी करून अज्ञातांनी भरदुपारी घराच्या पाठीमागील भिंत पाेखरून सुमारे १ लाख ८८ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले. ही घटना तुळजापूर तालुक्यातील ढेकरी येथे २० सप्टेंबर राेजी सकाळी साडेअकरा ते दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी तुळजापूर पाेलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, ढेकरी येथील आकाश अगतराव पटाडे हे कुटुंबीयांसह आपल्या शेतात कांदा लागवड करण्यासाठी गेले हाेते. याचदरम्यान गावात काही लाेक संशयास्पदरीत्या फिरत हाेते. काहींना संशय आल्यानंतर हटकले असता, ‘‘आम्ही माेहाेळ झाडायला आलाे आहाेत’’, असे सांगितले. तर काहींना ‘‘मांजर पकडायला आलाे आहाेत’’, असे म्हटले. यानंतर संबंधित लाेक पटाडे यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या पडक्या जागेत शिरले. आजूबाजूला काेणीही नसल्याची संधी साधत घराच्या पाठीमागील भिंत भाेडून आत प्रवेश मिळविला. यानंतर घरातील अर्धा ताेळे वजनाच्या साेन्याच्या चार अंगठ्या, दाेन ताेळे वजनाचे साेन्याचे गंठण, कानातील साेन्याचे कानवळे, सात ग्रॅम वजनाचे मिनी गंठण, सात ग्रॅम वजनाची बाेरमाळ, आठ ताेळे वजनाचे चांदीचे चेन व ताेडे आणि राेख १५ हजार रूपये लंपास केले. चाेरीची ही घटना समाेर आल्यानंतर पटाडे यांनी तुळजापूर पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञातांविरुद्ध चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.