उमरगा : शहरातील जिल्हा परिषद हायस्कूलच्या मैदानात २५ गुंठे जागेत मियावाकी या जपानी पद्धतीने तब्बल साडेचार हजार वृक्षांची लागवड मागील वर्षी जुलै महिन्यात करण्यात आली होती. शाळा प्रशासनाकडून त्यांचे योग्य संवर्धन केले गेल्याने या ठिकाणी आता चांगले जंगल उभे राहिले आहे.
मागील वर्षी जिल्हा परिषद हायस्कूलचे भलेमोठे मैदान पाहून तसेच सर्वच मैदानाचा वापर होत नसल्याचे समजल्यानंतर तहसीलदार संजय पवार यांनी मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांना या मैदानावर मियावाकी या जपानी पद्धतीने वृक्षारोपण करता येईल व तालुक्यात या पद्धतीने जंगल निर्मिती करता येते हे दाखविण्यासाठी मॉडेल तयार करता येईल, अशी कल्पना सुचवून त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार तहसीलदार संजय पवार यांच्या संकल्पनेला मूर्तस्वरूप देण्याचा निर्णय मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी घेतला. यासाठी जिल्हा परिषद शाळा इमारतीसमोरील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यासाठी एक पायलट प्रोजक्ट तयार करण्यात आला. त्यात एक मीटर बाय एक मीटर अंतरावर २५ गुंठे जागेत २० प्रकारच्या विविध जातीच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. मियावाकी ही वृक्षारोपण पद्धत जपान देशात विकसित झालेली आहे. अशा प्रकारची वृक्षारोपण करण्यात आलेली तालुक्यातील पहिलीच शाळा आहे. जंगलनिर्मिती करण्यासाठी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले व तहसीलदार संजय पवार यांचे मार्गदर्शन लाभले. प्रत्यक्ष झाडे जगविण्यासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, किरण गायकवाड यांनीही आर्थिक व श्रमदानातून मदत केली. नगरसेवक पंढरीनाथ कोणे, नगराध्यक्ष प्रेमलता टोपगे, उपनगराध्यक्ष हंसराज गायकवाड, विक्रम मस्के, वसीम शेख, सुनंदा वरवटे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष शकुंतला मोरे, उपाध्यक्ष शंकर सुरवसे, अशोक पतगे यांनीही वेळोवेळी सहकार्य करून ही झाडे जगवण्यासाठी मार्गदर्शन केले. ही झाडे फक्त दहा महिन्यांची असून, शाळेतील बोअरवेलला शालेय व्यवस्थापन समितीने २५ हजारांचा लोकवाटा जमा करून देऊन पाइपलाइन करून दिली. तसेच नवीन मोटार देऊन पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवला. शाळेतील परिचर वनमाला वाले व सुनीता राठोड यांनी झाडे जगवण्यासाठी भरपूर परिश्रम घेतले. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बाबूराव पवार व शाळेतील सर्व शिक्षकांचेही याकामी सहकार्य लाभले.
कोट......
मियावाकी जंगल कसे असते, हे शहरातील व तालुक्यातील नागरिकांना आणि शिक्षकांना पाहता यावे, वृक्षारोपणाचे महत्त्व जनतेला कळावे, हा यामागील उद्देश आहे. शिवाय, एक झाड हजारो लोकांना ऑक्सिजन देते. एका माणसामागे सात झाडे असे प्रमाण गरजेचे असताना सध्या पाच माणसामागे एक झाड अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणूनच आम्ही कमी जागेत जास्त झाडे लावून जंगल निर्मिती केली आहे. उमरगा शहरा व तालुक्यातील शिक्षक, विद्यार्थी व नागरिकांना लवकरच हे जंगल पाहायला मिळणार आहे.
- पद्माकर मोरे, मुख्याध्यापक