भूम : अलमप्रभू यात्रा महोत्सव सुरू झाला असून, भाविकांना दर्शन घेण्यासाठी फिजिकल डिस्टन्स ठेवून रांगेत पाठविण्यात येत आहे. तत्पूर्वी, अलमप्रभू पुजारी मंडळाच्या वतीने प्रत्येक भाविकाचे हात सॅनिटाइज करून विनामास्क येणाऱ्या भाविकांना मास्कदेखील देण्यात येत आहे.
शहारासह तालुक्यातील अठरा पगड जातींचे आराध्यदैवत असलेल्या अलमप्रभू देवस्थानचा यात्रा महोत्सव सध्या सुरू असून, या उत्सवात विविध ठिकाणांहून भाविक दर्शनासाठी येत आहेत. या भाविकांना कोरोनाच्या प्रादुर्भावापासून दूर ठेवण्यासाठी येथील पुजारी मंडळाच्या वतीने भक्तांना दर्शन घेण्यापूर्वी हातावर सॅनिटायजर टाकून मास्क देत आहेत. यात्रा काळातील सर्व उत्सवावर अगोदरच निर्बंध आणले आहेत. यामुळे शहरातून श्रींच्या रथाची मिरवणूकदेखील ट्रस्टच्या वतीने काढण्यात आली नाही. रथाचे दर्शनदेखील कसबा रोडवरील दत्त मंदिर येथे भाविकांना फिजिकल डिस्टन्स ठेवूनच देण्यात येणार आहे. भक्तांना रांगेत दर्शन घेता यावे याकरता ट्रस्टच्या वतीने दोन्ही बाजूंनी बांबू लावले असून, मोजक्याच लोकांना वेळेच्या अंतराने रथाचे दर्शन घेण्यासाठी सोडले जाणार आहे. दरम्यान, रथाचे दर्शन झाल्यानंतर अलमप्रभू देवस्थान येथे भाविक दर्शन घेण्यासाठी जातात. यामुळे येथेदेखील पुजारी मंडळाच्या वतीने सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. याठिकाणी नायब तहसीलदार प्रमोद सावंत, सहायक पोलीस निरीक्षक कैलास भारती, पोउपनि. राजेश गडवे, माजी नगरसेवक रूपेश शेंडगे, पुजारी भारत भारती, पिंटू भारती व विकास भारती हे लक्ष ठेवून आहेत.