धाराशिव/पाथरूड : भूम तालुक्यातील पाथ्रुड येथील बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या १८ वर्षीय तरुणास क्रूरतेचा कळस गाठत सात ते आठ जणांनी रॉड, काठी तसेच तीक्ष्ण हत्याराने मारहाण केली हाेती. मारहाणीत मृत झाल्याचे समजून त्या तरुणास पांढरेवाडी शिवारातील रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची घटना ११ मार्चला उजेडात आली हाेती. साेलापूर येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू हाेते. मात्र, ‘माउली’ची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. १६ मार्चला त्याचा मृत्यू झाला अन् गिरी कुटुंबासह संपूर्ण दुधाेडी गावावर शाेककळा पसरली.भूम तालुक्यातील पाथ्रुड येथील माउली बाबासाहेब गिरी, असे अमानुष मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. ३ मार्चला दुपारी माउलीचा त्यास परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथील सतीश जगताप व इतर सहा ते सात जणांनी लोखंडी रॉड, काठीने जबर मारहाण केल्याचा फोन आला होता. यानंतर त्यास फोन केला असता, तो सातत्याने बंद लागत होता. यामुळे बस प्रवासात फिर्यादी वडिलांनी त्यांचे भाऊ व मित्राला याबाबतची माहिती देऊन शोध घेण्याची विनंती केली. दरम्यान, सायंकाळी ५ वाजता काळेवाडी येथील पोलिस पाटलांनी बाबासाहेब गिरी यांना फोन करून त्यांचा मुलगा माउली यास जबर मारहाण करून त्यास नग्नावस्थेत पश्चिम पांढरेवाडी शिवारातील रस्त्यालगत फेकून दिल्याचे सांगितले. माउलीचा शोध घेऊन त्याला जामखेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
क्रूरपणे मारहाण झालेल्या ‘माउली’चा तेराव्या दिवशी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 13:51 IST