गुंजोटी : घंटागाडीच्या हुकाला अडकून आलेले महिलेचे जवळपास अडीच तोळे वजनाचे मंगळसूत्र चालकाने ग्रामपंचायतीकडे तर ग्रामपंचायतीने संबंधित महिलेकडे सुपूर्द केले. त्यामुळे चालकाच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
घंटागाडीने कचरा संकलन करत असताना एका महिलेचे मंगळसूत्र या गाडीच्या हुकाला अडकून गाडीसोबत आले होते. त्यावेळी चालक मल्लिनाथ कारभारी व संबंधित महिलेच्याही ही बाब लक्षात आली नाही. मात्र, कचरा संकलन करून कचरा डेपोत गाडी रिकामी करण्यासाठी नेली असता चालकाला हे मंगळसूत्र दिसले. त्यामुळे चालकाने ते तत्काळ ग्रामपंचायतीकडे परत केले. ग्रामपंचायतीने घंटागाडी गेलेल्या भागात चॊकशी केली असता हे मंगळसूत्र पतंगे यांचे असल्याचे समोर आले. यामुळे चालक कारभारी यांच्या हस्ते त्यांना ते परत करण्यात आले.
दरम्यान, चालक मल्लिनाथ कारभारी यांच्या प्रामाणिकपणाबद्दल ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सरस्वती कारे, उपसरपंच आयुब मुजावर, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र देशमुख, योगेश शिंदे, इंद्रजित म्हेत्रे, श्रीनिवास हिरवे, शेषेराव खंडागळे, स्नेहा पाटील, कोशल्या बेळमकर, विजया चव्हाण, बसवराज टोंपे, सतीश कारे, किशन पाटील, ग्रामविकास अधिकारी व्यंकट मुळे आदी उपस्थित होते.