समीर सुतके
उमरगा : शहरात गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी समस्या कायम आहे. शहरातून जाणारा महामार्ग असो वा शहरातील मुख्य बाजारपेठ असो, येथे कायम वाहनांची गर्दीमुळे असते. यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना पादचाऱ्यांनादेखील मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज शहरवासीयांमधून व्यक्त होत आहे.
शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट बनत आहे. विशेषत: बाळासाहेब ठाकरे चौक, इंदिरा चौक, आरोग्य नगरी कॉर्नर, पतंगे रोड, शिवपुरी कॉर्नर व मुख्य बाजारपेठ येथे वाहनांच्या गर्दीने कायमस्वरूपी वाहतूक कोंडी निर्माण होते. शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये रस्ता खूपच अरुंद असल्याने पायी चालणे अवघड असताना येथे दुचाकी, रिक्षा यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथे सर्वात जास्त कोंडी होताना दिसते. इंदिरा चौकातून महादेव मंदिराला जाणारा रस्ता मुळातच अरुंद. त्यातच रस्त्यावर दुभाजक केल्याने वाहनांच्या गर्दीतून पायी जाणे शक्य होत नाही. पतंगे रोडवर तर बेशिस्त वाहन पार्किंगसह भरधाव वाहने चालविली जात असल्याने येथे नेहमीच छोटे-मोठे अपघात होतात.
चौकट.....
महामार्गावर गर्दी
शहरातून जाणाऱ्या महामार्गावर कायम वाहनांची गर्दी असते. त्यात दोन्ही बाजूंनी फळविक्रेते, भाजी विक्रेते, लहानसहान साहित्य विक्री करणाऱ्यांची गर्दी असते. याच रस्त्याच्या दोन्ही बाजूने दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहने सर्रास लावली जातात. यामुळे महामार्गावरून एकेरी वाहतूक करावी लागते.
फूटपाथ नाहीच
शहरातून जवळपास चार किमी महामार्ग जातो. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी फूटपाथ होणे गरजेचे असताना पालिकेतील आतापर्यंतच्या कोणत्याही सत्ताधाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले नाहीत. परिणामी या जागी अतिक्रमणे झालेली आहेत. कित्येक दुकानदार आपल्या दुकानासमोरील जागा हातगाडे व फेरीवाल्यांना भाड्याने देऊन पैसे कमवीत आहेत.
अतिक्रमण हटाव मोहीम नावालाच
अतिक्रमणाबाबत जास्त गदारोळ झाल्यास पालिका प्रशासनाकडून शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहीम चालू केली जाते. परंतु, यानंतर पुन्हा तिथे अतिक्रमण होऊ नये याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम ही नावालाच होत आहे असे दिसून येते.
कोट.......
शहरातील वाहनचालकांवर ना कोणाचे नियंत्रण आहे, ना पार्किंगसाठी कोठे जागा. वाहनांच्या बेशिस्तपणामुळे कधी अपघात होईल याची शाश्वती राहिली नाही. प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे.
- गजानन पाटील,नागरिक
शहराचा विस्तार, तसेच वाहनांची संख्याही वाढत आहे. त्यानुसार पार्किंगची सुविधा व वाहन चालविणाऱ्यांवर नियंत्रण प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्याचबरोबर पालिकेतील लोकप्रतिनिधींनादेखील या समस्येची जाणीव नसल्याचे दिसून येते.
- बळीराम गायकवाड, नागरिक
‘पे अँड पार्किंग’ स्वरूपात शहरातील महामार्गालगत असलेल्या मोकळ्या जागेत पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. बाजारपेठेत जाणाऱ्यांना या ठिकाणी वाहने पार्किंग करावी लागणार आहेत. याचा प्रस्ताव मंजुरीसाठी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार आहोत.
- रामकृष्ण जाधवर, मुख्याधिकारी