उस्मानाबाद : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही भिन्न विचारांच्या पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. यांचे सरकार फारकाळ टिकणार नाही, असा दावा भाजपकडून पहिल्या दिवसापासून केला जात आहे. असे असतानाच मध्यंतरी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने एकी दाखवून दिली. सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत मात्र, १०० टक्के ग्रामपंचायतींत तिन्ही पक्षांची माेट बांधून ‘महाविकास आघाडी’चा एकच पॅनल देण्यात स्थानिक नेतृत्व यशस्वी हाेऊ शकले नाही. तीनही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी केलेल्या दाव्यानुसार केवळ ४० ते ४५ टक्के ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी लढत देत आहे. मात्र, निकालानंतर अनेक ठिकाणी तिन्ही पक्षांची गट्टी जमून येईल, अशी अशा या मंडळीने व्यक्त केली.
जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली हाेती. यापैकी ४० ग्रामपंचायती बिनिवराेध निघाल्या आहेत. त्यामुळे १५ जानेवारी राेजी ३८८ ग्रामपंचायतीसाठी मतदान हाेणार आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. ही महाविकास आघाडी विधान परिषद निवडणुकीतही दिली. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या आखाड्यातही हे तीन पक्ष एकत्र येत ताकद दाखवितील, असा दावा राज्यपातळीवरील नेत्यांकडून करण्यात आला हाेता; परंतु प्रत्यक्षात स्थानिक पातळीवरील नेतेमंडळीला या तीन पक्षांची माेट बांधण्यात फारसे यश आलेले नाही. ४० ते ४५ टक्के ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीचे पॅनल एकत्रित लढत आहे, असा दावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात हे प्रमाण कमी आहे. दरम्यान, निवडणूक निकालानंतर अनेक ग्रामपंचायतीत वेगवेगळे लढणारे तिन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, असा विश्वासही या तीनही पक्षांकडून व्यक्त करण्यात आला आहे. असे असले तरी महाविकास आघाडीला विधानसभा, विधान परिषदेत जे जमले ते स्थानिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत का जमले नाही? हे स्थानिक नेत्यांचे अपयश आहे का? असे एक ना अनेक सवाल उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
चाैकट...
राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने एकत्र येत सत्ता स्थापली आहे. हे सरकार चांगले काम करीत आहे. हे सूत्र जास्तीत जास्त ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्यक्षात यावे, यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न करण्यात आले. त्याला जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास ५० टक्के ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी लढत देत आहे.
-कैलास पाटील, आमदार तथा जिल्हाध्यक्ष, शिवसेना.
विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला माेठे यश मिळाले. त्यामुळे अधिकाधिका ग्रामपंचायतीतही तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढावी, अशी चर्चा झाली हाेती. त्यानुसार प्रयत्नही करण्यात आले. त्यास चांगले यश आले आहे. साधारपणे ४० ते ४५ ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढत आहेत.
-ॲड. धीरज पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून ज्या-ज्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढत देण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रयत्न यशस्वी झाले. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त ग्रामपंचायतींत हा प्रयत्न केला आहे. साधारपणे ४५ ते ५० टक्के ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी म्हणून आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते लढत आहेत. हा प्रयाेगही निश्चित यशस्वी हाेईल.
-सुरेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.
निकालानंतर बदलू शकते चित्र...
काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीकडून करण्यात ४० ते ४५ टक्के ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढत आहाेत, असे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात हे प्रमाण एवढे नाही. मात्र, निवडणूक निकालानंतर अनेक ग्रामपंचायतींत हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता काबीज करू शकतात. त्यामुळे निकालानंतर महाविकास आघाडीच्या स्थानिक नेतेमंडळीचा दावा प्रत्यक्षात येऊ शकताे.
पाॅइंटर...
जिल्ह्यातील निवडणूक रणधुमाळी सुरू असलेल्या खासकरून माेठ्या ग्रामपंचायतींत अनेक ठिकाणी शिवसेना व राष्ट्रवादी या दाेनच पक्षात प्रमुख लढत झालेली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी महाविकास आघाडी आकारास येऊ शकली नाही. तसेच काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दाेनच पक्ष प्रबळ आहेत. त्यामुळे अशा ठिकाणीही आघाडी हाेऊ शकली नाही. ज्या ठिकाणी भाजप प्रमुख विराेधक आहे, अशा बहुतांश ठिकाणी आघाडी दिसते. तर काही काही ठिकाणी आघाडीत फूट पडली आहे.