मुरूम (जि. उस्मानाबाद) - उमरगा तालुक्यातील केसरजवळगा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाखालील विहिरीवरील पंप विजेच्या कमी दाबामुळे नेहमी बंद असताे. त्यामुळे गावात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. प्रामुख्याने प्रभाग क्रमांक-१ व २ या दोन प्रभागांत पाणीटंचाईची समस्या तीव्र झाली आहे.
केसरजवळगा हे गाव कर्नाटकच्या सीमेवरील शेवटचे गाव आहे. गावची लोकसंख्या आठ हजारांच्या जवळपास असून, गावात पाच प्रभाग आहेत. गावास केसरजवळगा-निरगुडी रस्त्यावरील साठवण तलावाखालील विहिरीतून नळयोजनेद्वारे आणि कूपनलिकेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. दाेन्ही स्रोतांना यंदा भरपूर पाणी उपलब्ध आहे. मात्र, साठवण तलाव परिसरात पिकांना पाणी देण्यासाठी शेतीपंपांचा वापर वाढला आहे. त्यामुळे या भागातील रोहित्रांवर क्षमतेपेक्षा अधिक भार झाल्याने पाणीपुरवठ्याचे पंप कमी दाबामुळे चालत नसल्याचे पाणीपुरवठा कर्मचारी व ग्रामपंचायतीकडून सांगितले जात आहे. साठवण तलाव परिसरात यंदा पाऊस चांगला झाल्याने उसाचे क्षेत्रही वाढले आहे. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी वीजपंपांचा वापर एकाच वेळी करीत असल्याने सगळ्याच पंपांना योग्य दाबाने वीज मिळणे अवघड झाले आहे.
चाैकट...
ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
गावातील प्रभाग-१ व २ च्या सदस्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मासिक बैठकीत हनुमान मंदिरापासून ते अंबाबाई मंदिरापर्यंत नव्याने जलवाहिनी टाकण्याची मागणी केली आहे. मात्र, याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने गावात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याचे ग्रामपंचायत सदस्य सांगत आहेत.
जलवाहिनीसाठी दमडीही नाही...
चौदाव्या वित्त आयोगातून अनेकवेळा ग्रामपंचायतीने लाखो रुपयांची उधळपट्टी केली आहे. मात्र, नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या जलवाहिनीसाठी दमडीही खर्च केली नाही. ५० पाइप टाकले की, या प्रभागासाठी पर्यायी कूपनलिकांचे पाणी प्रभाग-१ व २ मधील नागरिकांना मिळू शकते, असे ग्रामपंचायत सदस्यांकडून सांगितले जात आहे.
विजेच्या कमी दाबामुळे प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यापासून साठवण तलावाखालील विहिरीवरील पाणीपुरवठ्याचे पंप चालत नाहीत. त्यामुळे हनुमान मंदिरापासून ते अंबाबाई मंदिरापर्यंत नव्याने जलवाहिनी टाकण्याची मागणी सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे केली आहे. मात्र, आमच्या मागणीकडे सरपंच व तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.
-जयपालसिंग राजपूत, सदस्य
केसरजवळगा येथे पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाखालील विहिरीवरील पंपाला कमी दाबाने वीज मिळत असल्याने पंप अनेकवेळा चालत नाहीत. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडते. नवीन जलवाहिनी टाकण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी माझ्याकडे तरी अद्यापपर्यंत केलेली नाही.
-जी.डी. हलबुर्गे, ग्रामविकास अधिकारी